मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर १८० ते २०० मीटर हवे या मागणीवर मच्छीमार संघटना ठाम असून पालिकेच्या निर्णयाचा संघटनांनी विरोध केला आहे. दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर पुरेसे असल्याचे पालिकेने राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र हे अंतर बोटींच्या येण्या-जाण्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे स्पष्ट करीत मच्छीमार संघटनांनी पुन्हा एकदा सागरी प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेचा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या मार्गातर्गत ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहे. त्याकरिता वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चिघळला आहे. वरळी येथील ‘क्लिव्हलॅण्ड जेट्टी’मधून मच्छीमारांच्या बोटींची ये-जा सुरू असते. त्याच्यासमोरील दोन खांबांमधील अंतर २०० मीटर ठेवावे अशी मागणी वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेकडून करण्यात आली होती. त्यामुळे पालिकेने या विषयावरील अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय समुद्री विज्ञान (एनआयओ) संस्थेची नियुक्ती केली होती. दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर पुरेसे असल्याचा अहवाल संस्थेने दिला असून पालिका प्रशासनाने मच्छीमारांची मागणी जवळजवळ फेटाळून लावली आहे. मात्र या निर्णयामुळे मच्छीमार संघटनांमध्ये नाराजी असून हा विषय पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत.
मच्छीमारांच्या या मागणीवर तोडगा काढण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिका अधिकारी व वरळी येथील मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी मच्छीमार संघटनांना आपले म्हणणे तांत्रिकदृष्टय़ा योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ संस्थेचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मच्छीमार संघटनांनी रत्नागिरी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) या संस्थेचा अहवाल सादर केला होता. या अहवालात डॉ. सुरेंद्र सी. ठाकूरदेसाई यांनी वादळी लाटा विचारात घेऊन बोटींच्या सुरक्षित वाहतुकीसाठी दोन खांबांमध्ये कमीत कमी १६० मीटर अंतर असण्याची आवश्यकता आहे, असे नमूद केले होते. मात्र त्यानंतर पालिकेने हा अहवाल राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला (एनआयओ) अभिप्रायार्थ पाठविण्यात आला होता. एनआयओने मात्र ६० मीटर अंतर पुरेसे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमचा अहवाल मान्य न करता पालिकेने आपल्याला हवा तो अहवाल तयार करवून घेतल्याचा आरोप मच्छीमार संघटनेचे नितेश पाटील यांनी केला आहे.
६० मीटर अंतर पुरेसे नसल्यामुळेच पालिका या खांबांना संरक्षक कवच लावत आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, असाही युक्तीवाद पाटील यांनी केला आहे. दरम्यान, वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि वरळी कोळीवाडा सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड या दोन संस्थांनी पालिकेच्या निर्णयाला विरोध केला असून काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना विरोध
पालिकेने मच्छीमारांच्या सोयीसाठी कोणत्या सुविधा या बंदराजवळ केल्या आहेत, विमा योजना कशी आणली आहे, याची माहिती देणारी पत्रके पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कोळीवाडय़ात वाटली. मात्र कोळी संघटनांचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले.