मुंबई : ‘नीटी’चे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईमध्ये (आयआयएम मुंबई) रुपांतर होऊन अवघी दोन वर्षे झाली असताना या संस्थेमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यंदा आयआयएम मुंबईमध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या ५४० जागांसाठी देशभरातून तब्बल ५ लाख ५९ हजार ८८७ अर्ज आले आहेत. यामध्ये मुलींच्या अर्जांची संख्या १ लाख ९० हजार ५३८ इतकी आहे. गतवर्षी या अभ्यासक्रमासाठी अवघ्या १३ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंगला (नीटी) आयआयएम मुंबईची मान्यता मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आयआयएम मुंबईमध्ये शिकविण्यात येत असलेल्या एमबीए अभ्यासक्रमासाठी ३३० जागा, एमबीए इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी १८० आणि एमबीए इन सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंटसाठी ३० जागा अशा एकूण ५४० जागा आहेत. या ५४० जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेअंतर्गत देशभरातून जवळपास ५ लाख ५९ हजार ८८७ इतके अर्ज आले आहेत. यात एमबीए अभ्यासक्रमासाठी २ लाख ६९ हजार ३५६, एमबीए इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी ७७ हजार ६१८ आणि एमबीए इन सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी २ लाख १२ हजार ९१३ अर्ज आले आहेत. यात मुलांच्या अर्जाची संख्या १ लाख ७२ हजार २०७ तर मुलींच्या अर्जांची संख्या १ लाख ९० हजार ५३८ एवढी आहे. तसेच यंदा १५ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
गतवर्षी अवघे १३ हजार अर्ज
गतवर्षी प्रथमच राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी देशभरातून अवघे १३ हजार ५३४ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी ९ हजार ४३०, एमबीए इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी २ हजार ६६५ आणि एमबीए इन सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी १ हजार ४३९ अर्ज आले होते. यामध्ये १० हजार ३९ मुलांच्या, तर ३ हजार ४८८ मुलींच्या अर्जांचा समावेश होता. तसेच सात तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
यामुळे वाढली अर्जांची संख्या
गतवर्षी प्रथमच आयआयएम मुंबई स्थापन झाली असल्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पोर्टलवर आयआयएम मुंबईचा पर्याय उपलब्ध नव्हता. परिणामी, विद्यार्थ्यांना आयआयएम मुंबईच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागत होता. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेची माहिती नव्हती. मात्र यंदा पोर्टलवर आयआयएम मुंबईचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना सहज पर्याय उपलब्ध होत असल्याने अर्जांची संख्या वाढली. अधिकाधिक अर्ज आल्याने प्रवेश प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक होईल, असे आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले.