ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ठाणे, मुंब्रा तसेच कल्याण भागात सापळा रचून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले . यामध्ये ठाणे महापालिका साहाय्यक आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि भू-मापक महिला अधिकारी व खासगी दलालाचा समावेश आहे.
नौपाडा पोलिसांनी एका फसवणुकीच्या गुन्ह्य़ामध्ये किरण आनंदा सानप याला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडी असून त्याला जामीन द्यावा की नाही, यासाठी तपासी अधिकाऱ्याचे मत असलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार होता. यामध्ये त्याला जामीन मिळवून देण्यासाठी नौपाडय़ाचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत तुकाराम पवार यांनी २० हजारांची लाचेची मागणी केली होती.
याप्रकरणी किरणचे मामा चंद्रभान कांगणे यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दीपक विचारे यांच्या पथकाने नौपाडा पोलीस ठाण्यात सापळा रचून पवार यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
दिवा भागामध्ये एका व्यक्तीच्या २४ खोल्या असून त्यापैकी सात खोल्यांवर ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त शाम थोरबोले यांनी कारवाई केली होती. उर्वरित खोल्यांवर कारवाई करून नये, यासाठी थोरबोले आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश मोहिते व ऋषिकेश भालेराव यांनी दीड लाखांची लाच मागितली होती.
याप्रकरणी तक्रार आल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. ठाणे येथील परेश कांती कोळी यांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी कल्याण भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या जमिनीची मोजणी करण्यासाठी भू करमापक अंजना दशरथ बनकर (३०) यांनी १५ हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अंजना आणि खासगी दलाल परशुराम कांबळे या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.