मुंबई :  हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदीवर भर देण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने याकरिता मुंबई महापालिकेला पाच कोटी रुपये निधी दिला असून त्यातून आतापर्यंत पाच यांत्रिकी झाडू वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तर उर्वरित निधीतून आणखी दोन झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. त्याकरिता आणखी दीड कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसेंदिवस ढासळणाऱ्या हवेच्या गुणवत्तेची दखल राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने घेतली आहे. प्रदूषणाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान परिवर्तन मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ हवा पंचवार्षिक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांर्तगत २०२४ पर्यंत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे व्यवस्थापन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार आहे. मंडळाने या कार्यक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला आहे. तर मुंबई महापालिकेला या कार्यक्रमासाठी १० कोटी रुपये निधी मिळणार आहे. सार्वजनिक जागरूकता व क्षमतावृद्धी, यांत्रिकी झाडमू वाहने खरेदी करणे व त्यांचे एक वर्षांकरिता प्रचालन व परिरक्षण, विद्युत स्मशानभूमी व वाहतूक समन्वयन प्रणाली असे उपक्रम या निधीतून राबवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या तिजोरीत यापैकी चार कोटी ७५ लाख रुपये निधी जमा झाला आहे. पालिकेने मुंबईतील रस्ते सफाईसाठी या निधीतून यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पावणेचार कोटी रुपये खर्चून पाच यांत्रिकी झाडू वाहने खरेदी करण्यात आली आहेत. मात्र तरीही एक कोटी २७ लाख रुपये निधी शिल्लक असून त्यातून आणखी दोन यांत्रिकी झाडू वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. ही यांत्रिकी झाडू वाहने विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे सोपविण्यात येणार आहेत. या वाहनांनी एकत्र केलेला कचरा डेब्रीज वाहून नेणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडवर नेला जाणार आहे. ही वाहने दोन पाळय़ांत चालणार असून प्रत्येक पाळीत चार तास काम होणार आहे. ही वाहने ताशी ६ कि.मी. या गतीने प्रतिदिन २८ कि.मी., तसेच महिना ८४० कि.मी. लांबीच्या रस्त्याची साफसफाई करणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five mechanical broom purchase to check air quality zws
First published on: 19-01-2022 at 01:17 IST