scorecardresearch

मुंबईत आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे

पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाते.

मुंबई: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत लवकरच मुंबईत आणखी पाच ठिकाणी स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात घाटकोपर, देवनार, शिवडी, भायखळा, आणि कांदिवली येथे केंद्रे स्थापन केली जातील. त्यामुळे या ठिकाणी प्रदूषणाची अचूक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. कचराभूमी आणि सर्वात वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवरील हवेची गुणवत्ता स्वयंचलित वाहनामार्फत तपासली जाते. सफर-मुंबई या उपक्रमाद्वारे या माहितीचे विश्लेषण करून अहवाल तयार केला जातो. त्यामुळे प्रदूषणासंदर्भात योजना आखण्यास अचूक माहिती उपलब्ध होत असते. आतापर्यंत पालिकेची अशी नऊ स्वयंचलित केंद्रे आहेत. मात्र आणखी पाच केंद्रे येत्या आर्थिक वर्षांत पर्यावरण विभागाच्यावतीने उभारली जाणार आहेत.

मुंबईतील शिवडी पूर्व परिसरात रासायनिक कंपन्या मोठय़ा प्रमाणावर आहेत. तसेच अनेक प्रकारच्या मालाची गोदामे आहेत, अवजड वाहनांची वर्दळही मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे या भागातील हवेत मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असते. म्हणून या भागात स्वयंचलित केंद्र असावे अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली होती. त्यावर प्रशासनाने आता पाच जागांची निवड केली असून त्यात शिवडी कोळीवाडा पालिका शाळेत एक केंद्र स्थापन केले जाणार आहे. तसेच घाटकोपरमध्ये पंतनगर शाळेत, देवनारमध्ये शिवाजीनगर डेपोमध्ये, भायखळय़ात जिजामाता उद्यानात आणि कांदिवलीत चारकोप प्रसुतीगृहाच्या आवारात ही  केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.

या स्वयंचलित केंद्राबाहेरील एलईडी फलकाद्वारे त्या विभागातील प्रदूषणाचे प्रमाण, वायू गुणवत्ता निर्देशांक यांची माहिती मिळू शकेल. त्यामुळे आरोग्य विषयक सल्लाही देणे पालिकेला शक्य होणार आहे. तसेच तापमान, हवेतील आद्र्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यांचीही माहिती मिळू शकणार आहे. प्रत्येक केंद्रावरील त्या -त्या वेळची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर व मोबाईल अ‍ॅपवरही उपलब्ध होऊ शकणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five more air quality survey centers in mumbai akp

ताज्या बातम्या