मुंबई : भायखळा परिसरातील घोडपदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथील जय कृपा टॉवर या इमारतीमधील उद्वाहन बुधवारी रात्री कोसळली. हा अपघात रात्री १० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या १८ मजली इमारतीमधील उद्वाहनची केबल तुटल्याने चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. घटनेनंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका सेवा, तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात एकूण पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी तीन जणांना जे.जे. रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात, तर एकाला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
