विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’ सेवा उपलब्ध

मुंबई : महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सोमवार, १ नोव्हेंबरपासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलांसाठी महावितरणच्या अ‍ॅपचा किंवा ऑनलाइन सुविधेचा वापर करावा लागेल. सध्या महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा एकूण १४०० कोटी रुपयांचा वीजबिल ‘ऑनलाइन’ भरत आहेत. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणने रोख वीजबिल स्वीकारण्याच्या रकमेबाबत १ नोव्हेंबरपासून ५ हजार रुपयांची मर्यादा घातली आहे. त्यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’ सेवा उपलब्ध असेल. तसेच धनादेशाद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे. तथापि, मुदतीनंतर धनादेश मंजूर झाल्यास विलंब आकार शुल्क आणि कोणत्याही कारणास्तव धनादेश नाकारला गेल्यास प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक प्रशासकीय शुल्क व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये ग्राहकांना भरावे लागतील.

वीजबिल पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास महावितरणचे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे भरणा करता येईल. मागील पावत्या व तपशील पाहणे ग्राहकांसाठी घरबसल्या शक्य आहे. एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्यांचे बिल भरण्यासह इतर सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बॅकिं ग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बँकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ५०० रुपयांच्या मर्यादेत पाव टक्के सवलत मिळेल. क्रे डिट कार्ड वगळता सर्व ‘ऑनलाइन वीजबिल भरणा हा नि:शुल्क आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायटय़ांच्या ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.