तात्पुरत्या मालवाहू पुलाचा पक्षीनिरीक्षणासाठी वापर; ‘एमएमआरडीए’चा निर्णय

मुंबई : मुंबई पार बंदर प्रकल्पामुळे (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) मुंबई ते नवी मुंबई प्रवास वेगवान आणि सागरसौंदर्याचा आनंद लुटत करता येणार आहे. त्याचबरोबर आता या सागरी सेतूवरून रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे दर्शनही सहजसोपे होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी येथे सामान आणि मोठी यंत्रसामग्री वाहून नेण्यासाठी बांधलेला तात्पुरता पूल न पडता कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून या पुलाचे रूपांतर फ्लेमिंगो पाहण्यासाठीच्या जागेत करण्यात येणार आहे.   मुंबई  परिसरात शिवडी खाडी  हे  फ्लेमिंगोचे सर्वात महत्त्वाचे निवासस्थान (अधिवास) आहे. 

शिवडी खाडीवरूनच पुढे जाणाऱ्या सागरी सेतूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो दिसतात. फ्लेमिंगोचा हा अधिवास कायम राहावा यासाठी सागरी सेतू प्रकल्पात विशेष काळजी घेण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे, तर फ्लेमिंगोचे दर्शन घेणे सोपे व्हावे, फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने एमएमआरडीएने आणखी एक पाऊल उचलले आहे. शिवडी खाडीकिनारी एमएमआरडीएने एक तात्पुरता पूल उभारला आहे. या पुलावरून बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्री नेली जाते. मूळ प्रस्तावानुसार सागरी सेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल पाडण्यात येणार होता;  पण हा पूल पाडण्यासाठी बराच खर्च येणार आहे. त्यामुळे आता हा पूल न पाडता त्याचे रूपांतर फ्लेमिंगो दर्शनाच्या जागेत करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

होणार काय?

या पुलावर पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अभ्यासक, पक्षिप्रेमी आणि हौशी नागरिकांना मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात निसर्गसहवासाचे तसेच सहलीसारखे स्थान निर्माण होईल.  पक्ष्यांच्या अधिवासाला धक्का न लावता ही योजना राबविली जाणार आहे.

फ्लेमिंगो सुरक्षित… सागरी सेतूच्या कामामुळे फ्लेमिंगोंना हानी पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती; पण प्रत्यक्षात मात्र फ्लेमिंगोला या कामाचा फटका बसला नसल्याचे निरीक्षण पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी नोंदविल्याचे म्हटले जात आहे. काम सुरू असतानाही हिवाळ्यात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो अधिवास करत असल्याचेही चित्र आहे.