|| संदीप आचार्य
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेल्या नागरिकांबाबत चिंता

मुंबई : पुराचा विळखा काही काळात ओसरेल मात्र करोनाचा विळखा आजही कायम असून पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असले तरी आता त्यांच्यामार्फत करोनाचा फैलाव होणार नाही ना, ही चिंता आरोग्य विभागाला भेडसावत आहे.

कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना  सुरक्षित ठिकाणी हलवले असले तरी यातून आरोग्याचे काही प्रश्न निर्माण झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेल्या या नागरिकांना प्रामुख्याने शाळा तसेच काही इमारतींमध्ये ठेवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असून करोना सुरक्षिततेविषयीचे बहुतेक नियम येथे पाळणे शक्य नाही.

सक्रिय रुग्णसंख्या जास्त असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा येथे जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येकाची तात्काळ अँटिजेन चाचणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. एकाच ठिकाणी राहणाऱ्या या नागरिकांमधून करोना पसरू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.

८ जुलै ते २२ जुलै या काळात राज्यातील अन्य जिल्ह्य़ांच्या तुलनेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे सर्वात सक्रिय करोना जिल्हे म्हणून नोंदविण्यात आले आहेत.

सक्रिय करोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये शासनाने करोनाला अटकाव करण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवले होते. मात्र यातील अनेक जिल्ह्य़ांची पुरामुळे दैना उडाली असून आगामी काळात या भागात करोना रोखण्यासाठी लोकांना विश्वासत घेऊन कशा प्रकारे उपाययोजना करायच्या यावर आता आरोग्य विभागाला काम करावे लागणार लागणार असल्याचे डॉ. सतीश पवार म्हणाले.

निर्बंधपालन अशक्य

कोल्हापूर हा करोना सक्रिय जिल्हा असून तेथे १,६२,५६४ लोकांना, तर सांगलीमध्ये २,११,८०८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सातारा येथे ४९,१४९, ठाणे ६९३०, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे १२०० आणि १२७१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तेथे अंतरनियमाचे पालन होऊ शकत नाही. आरोग्य विभागाने जवळपास सर्व नागरिकांची अँटिजेन चाचणी केली असली तरी करोना फैलावाचा धोका असल्याची भीती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.