फुलेखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; झेंडूचे दर तूर्त स्थिर, मात्र दरांत वाढ होण्याची शक्यता

अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या दसऱ्याने बाजारातही उत्साह निर्माण केला असून उत्सवाचा आनंद सुगंधित करण्यासाठी फूलबाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. दसऱ्याच्या दिवशी विशेष महत्त्व असलेल्या झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला आहे. मुंबईतील दादर येथील फूलबाजारात झेंडूचे दर गुरुवारी स्थिर असले तरी शुक्रवार, शनिवारी झेंडू शंभरी गाठण्याची शक्यता आहे. बाजारात चांगली मागणी असलेल्या कलकत्ता झेंडूच्या दरांनी आतापासूनच शंभरी गाठली असून शनिवारी ते दीडशे रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शेवंतीच्या फुलांनी प्रति किलो २०० रुपयांचा भाव गाठला असल्याने सर्वसामान्यांना हा दरवळ घरात आणणे कठीण बनले आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या गेलेल्या विजयादशमीच्या सणात झेंडुच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर, ठाणे, कल्याण येथील मोठमोठे फूलबाजार झेंडूने व्यापून टाकले आहेत. यंदा झेंडूची आवक व्यवस्थित होत असल्याने गुरुवापर्यंत फुलांचे दर स्थिर होते. कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी सकाळी तब्बल तीन हजार टन झेंडू फुलांची आवक झाली. या ठिकाणी सध्या ६० ते ८० रुपये किलो दराने झेंडूची विक्री सुरू आहे. दुसरीकडे दादरच्या फूलबाजारात भरगच्च असलेला अष्टगंधा झेंडू तसेच नामधारी झेंडू ५० रुपये किलोने विकला जात आहे. वजनाने हलका असलेला आणि लवकर कोमेजणारा इंडिका झेंडू ४० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र, शुक्रवार-शनिवारी या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. ‘मुंबईत मोठय़ा आणि छोटय़ा झेंडूचा पुरेसा माल दाखल झालेला आहे. त्यामुळे या झेंडूंचे दर यंदा स्थिरच राहतील. फार तर १० टक्क्यांनी दरामध्ये वाढ होईल,’ असे दादर फूलबाजाराचे अध्यक्ष मनोज पुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, आकाराने छोटी मात्र जास्त दिवस टिकू शकणाऱ्या कलकत्ता झेंडूने आतापासूनच दराची शंभरी गाठली आहे. कलकत्ता झेंडू हा चार ते पाच दिवस टिकतो. त्यामुळे तोरणासाठी या झेंडूला जास्त मागणी असते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या फुलांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या बाजारात आलेल्या एकूण मालापैकी केवळ २० टक्के माल उत्तम दर्जाचा आहे. त्यामुळे या दर्जाची फुले सध्या १०० रुपये किलोने विकली जात आहेत. शुक्रवारी हे दर दीडशे रुपयांवर पोहोचतील, अशी शक्यता फूलविक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

शेवंती दोनशेपार

नवरात्रीत देवीला वाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेवंतीच्या फुलांनी दोनशे रुपये किलोचा आकडा गाठला आहे. या फुलांची बाजारातील आवक घटल्याने सध्या १६० ते २०० रुपये किलोने शेवंतीची फुले विकली जात आहेत. या दरांत शुक्रवारी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.