मागणीत वाढ, फुलांचे भावही स्थिर; नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह; यंदा समाधानकारक विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत

मुंबई : उत्सवावर आलेली मर्यादा, नैसर्गिक आपत्ती यांमुळे गेल्या दीड वर्षात आर्थिक स्थैर्य गमावलेल्या फूल बाजारात दसऱ्याच्या निमित्ताने चैतन्य आले आहे. गतवर्षीच्या तुलनेने करोनाकहर आटोक्यात आल्याने तसेच शिथिलीकरण झाल्याने नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. परिणामी फूल बाजारातील मागणी  वाढली असून यंदाचा दसरा दिलासाजनक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

पहिल्या टाळेबंदीत करोनाचा वाढलेला संसर्ग, प्रवास आणि उत्सवावरील निर्बंध यांमुळे फुलांची मागणी निम्म्याहून खाली घसरली होती. त्यात अवकाळी पावसामुळे कधी फुलांचे नुकसान झाले तर कधी आवक वाढल्याने हजारो किलो फुले कचऱ्यात फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. परिणामी, गेल्या दीड वर्षात फूल बाजारातील आर्थिक गणित बिघडले होते. परंतु गेल्या दोन दिवसांतील मागणी पाहता यंदाच्या दसऱ्याला व्यवसायाला चालना मिळेल, अशी आशा दादरच्या घाऊक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

‘करोनाकाळात आम्ही मोठे नुकसान सहन केले. उत्सवावर घातलेल्या निर्बंधांचा थेट परिणाम व्यवसायावर झाला. आजही निर्बंध लागू असले तरी शिथिलीकरण आणि  लसीकरणामुळे नागरिकांची भीती काहीशी दूर झाली आहे. शिवाय रेल्वे प्रवासही सुरू झाला आहे. त्यामुळे दसऱ्यानिमित्त होणारी फूल खरेदी दोन दिवसांपासून वाढली आहे. गेल्या दीड वर्षातील ही समाधानकारक विक्री म्हणावी लागेल,’ असे व्यापारी संजय जाधव यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात मोठी लगबग

घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात मोठी लगबग दिसत आहे. दादर स्थानकाशेजारीच किरकोळ बाजारपेठ असल्याने ठिकठिकाणाहून नागरिक फुले खरेदीसाठी येऊ लागले आहेत. कर्जत, शहापूर, पालघर, डहाणू भागांतून रानफुले घेऊन येणारे आदिवासी विक्रेतेही दादरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. हार, फुले, वेणी, तोरण, तांदळाच्या लोंब्या याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  

मंदिरे सुरू झाली तरी…

‘मंदिर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी भाविकांना मंदिरांमध्ये हार, फुले घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मंदिरांमधून फुलांसाठी होणारी मागणी अद्याप बंद असल्याने व्यवसायावर फारसा सकारात्मक परिणाम झालेला नाही. दसऱ्यासोबतच आधीचे नऊ दिवस मागणी वाढली असती तर अधिक दिलासा मिळाला असता,’ असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.