मुंबई : एकिकडे मोठ्या विमान कंपन्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे अडचणीत आलेल्या असताना स्थानिक पातळीवरील स्पर्धेत छोट्या विमान कंपन्या उतरल्या आहेत. जिल्ह्यांना राज्यांशी विमानाने जोडून तेथील प्रवाशांना अधिक वेगवान सेवा देण्यासाठी विमान कंपन्या प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीने आपल्या नियोजित नेटवर्कचा विस्तार करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यात आंध्र प्रदेशच्या राजामुंदरी, विजयवाडा, हुबळी या शहरांमधून विमानसेवा उपलब्ध होणार आहे. तसेच सोलापूर-हैदराबाद आणि गोवा-सोलापूर मार्गांवर अतिरिक्त सेवा उपलब्ध होणार आहे. येत्या काळात नांदेडहूनही ‘फ्लाय-९१’ची सेवा सुरू होईल.

‘फ्लाय ९१’ विमान कंपनीचे गोव्यात मुख्यालय आहे. देशातील विविध लहान शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा १० ते १७ एप्रिल दरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. हैदराबाद-राजमुंदरी आणि हैदराबाद-विजयवाडा या मार्गांवर कंपनीची दररोज दोन विमानांची सेवा प्रवाशांकरिता उपलब्ध असेल. हैदराबाद-हुबळी आणि हुबळी-बेंगळुरू दरम्यान दररोज एक विमान असेल. हैदराबाद-सोलापूर या मार्गावर कंपनीच्या आठवड्याला पाच , गोवा-सोलापूर मार्गावर आठवड्याला सहा विमानांचे उड्डाण होणार आहे. राजमुंदरी, विजयवाडा आणि हुबळी या शहरांचा समावेश करून या नेटवर्कचा विस्तार १२ शहरांमध्ये होईल, असे ‘फ्लाय-९१’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.

आर्थिक वाढ, उद्योजकता यात देशातील ‘टियर-२’ आणि ‘टियर-३’मधील शहरे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नव्या विस्तारामुळे विमान कंपनीच्या प्रादेशिक नेटवर्कमध्ये दरमहा सुमारे तीस हजार प्रवाशांची ने-आण होणार आहे. येत्या काही आठवड्यांत इंदूर, नांदेड आणि मंगळुरू या शहरांचाही नेटवर्कमध्ये समावेश करण्याची कंपनीची योजना आहे. ‘फ्लाय-९१’ची सेवा सध्या गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा), पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, कोची आणि अगत्ती (लक्षद्वीप) येथे उपलब्ध आहे.