मुंबई: गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी ‘फ्लाय ९१’ने दोन दिवसांपूर्वी युरोपियन टर्बोप्रॉप विमान उत्पादक कंपनी एटीआरसोबत ‘४० एटीआर ७२-६००’ विमानांसाठी करार केला. सुमारे १ अब्ज डॉलरचे हे कंत्राट, जगभरातील कोणत्याही प्रादेशिक विमान कंपनीकडून एटीआर विमानांसाठी मिळालेली आतापर्यंतची सर्वात मोठे कंत्राट आहे. यामुळे देशातील प्रादेशिक दळणवळणाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
भारताची सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या भारतातील सर्वात मोठी ‘एटीआर ऑपरेटर’ असून, तिच्या प्रादेशिक दळणवळणासाठी तिच्याकडे ४४ टर्बोप्रॉप विमानांचा कार्यरत ताफा आहे. सरकारी मालकीची अलायन्स एअरही ‘एटीआर’ विमाने चालवते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी कामकाज सुरू केलेल्या फ्लाय ९१ विमान कंपनीच्या ताफ्यात सध्या सहा विमाने आहेत. येत्या काही वर्षांत ६० पेक्षा जास्त विमाने बाळगण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही ऑर्डर विमान कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
नवी ४० एटीआर विमाने २०२७च्या अखेरीसपासून फ्लाय ९१ विमान कंपनीच्या ताफ्यात येण्यास सुरुवात होतील. शिवाय, २०३२पर्यंत पूर्ण ४० विमाने ताफ्यात दाखल होतील. सध्या, फ्लाय ९१ आठवड्याला सुमारे २८० उड्डाणे करते. कंपनीचे हवाई जाळे १२ शहरांमध्ये पसरलेले आहे. स्वतःला एक एकमेव देशांतर्गत विमानकंपनी म्हणवणाऱ्या ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीने स्वत:च्या ताफ्यात अधिक विमाने सामील करून घेऊन उड्डाण जाळ्याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
एटीआर ७२- ६०० विमानात ७० ते ७८ प्रवासी बसू शकतात. यामुळे लहान शहरात हवाई सेवा सुरू करण्यास मदत होणार आहे. या विमानाची पल्ला गाठण्याची क्षमता सुमारे १,५००-१,६५० किमी आहे.
‘फ्लाय ९१’ ही गोव्यातील रायबंदर येथे मुख्यालय असलेली व भारतातील लहान (द्विस्तरीय व त्रिस्तरीय) शहरांना जोडणारी एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ही विमान कंपनी गोवा, हैदराबाद, बंगळुरू, कोची यांसारख्या मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव व लक्षद्वीपमधील अगात्ती यासारख्या प्रादेशिक ठिकाणांना जोडते.
