मुंबई : विमान प्रवासात अतिरिक्त सामानाची मोठा अडचण होते. अतिरिक्त सामानाची समस्या सोडविण्यासाठी ”फ्लाय ९१” या प्रादेशिक विमान कंपनीतर्फे ”स्मार्ट बॅग ९१” ही योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रवासी ”फ्लाय ९१”च्या नेटवर्कवरील कोणत्याही मार्गावर अतिरिक्त सामान सवलतीच्या दरात आगाऊ बुक करू शकतात. या योजनेमुळे प्रवाशांना तिकीट काढतानाच किंवा विमान प्रवासापूर्वी १२ तास जादा वजनाचे सामान स्वस्त दरात पूर्व-आरक्षित करता येते आहे.

फ्लाय ९१” ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. विमान कंपनी प्रामुख्याने लहान (टीयर-२ आणि टीयर-३) शहरांना जोडण्याचे काम करते. ”स्मार्ट बॅग ९१” योजनेअंतर्गत प्रवासी बुकिंगच्या वेळी पाच किलो ते ३० किलोपर्यंतच्या सामानाच्या श्रेणीतून स्वतःच्या सामानासाठी श्रेणीची निवडू शकतात. त्यासाठी शुल्क एक हजार रुपयांपासून सुरू होते आणि ३० किलो अतिरिक्त सामानासाठी तीन हजार रुपयांपर्यंत जाते. यामुळे एका ठिकाणाहून पुन्हा घरी परतणारे प्रवासी, स्थलांतरित होणारे विद्यार्थी, व्यावसायिक प्रवासी, कुटुंबे किंवा दीर्घ प्रवासासाठी अतिरिक्त सामान घेऊन जाणाऱ्या ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. विद्यार्थी, व्यावसायिक किंवा जास्त सामानासह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी हा अत्यंत बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. ही योजना जागतिक विमान वाहतूक धोरणांशी सुसंगत आहे, असे ”फ्लाय ९१”चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.

”डिजिटल-फर्स्ट” भूमिकेनुसार ”फ्लाय ९१” व्हॉट्सअॅपद्वारे ऑटो चेक-इन, यूपीआयद्वारे संचालित क्यूआर सक्षम सेवा देण्यात येतो. या माध्यमातून गोवा (मोपा), पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, कोची, अगत्ती यांसह १२ ठिकाणे जोडली गेली आहेत. कंपनीकडे प्रामुख्याने ATR ७२ प्रकारची विमाने आहेत. कंपनीचा लोगो ”फ्लायिंग बटरफ्लाय” (उडणारे फुलपाखरू) आहे. जे भारताचे सौंदर्य आणि विविधता दर्शवते.