मुंबई : ‘फ्लायदुबई’च्या विमानात सहवैमानिकानेच प्रवासादरम्यान वैमानिकांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर व्यावसायिक वैमानिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर, वैमानिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे का, तसेच ठराविक कालावधीनंतर त्यांची सायकोमेट्रिक चाचणी घ्यावी का, याबाबत विचार सुरू आहे. मात्र, अशा अपवादात्मक घटनेनंतर अतिरिक्त चाचण्या लादल्यास आधीच तणावाखाली असलेल्या वैमानिकांवरील मानसिक दबाव वाढू शकतो, अशी भूमिका काही वैमानिकांनी मांडली आहे.

विमान प्रवासादरम्यान अनेकदा प्रवासी काही कारणास्तव गोंधळ घालतात. अशा आक्रमक प्रवाशांना हाताळण्यासाठी केबिन क्रूला प्रशिक्षण दिले जाते. मात्र, कॉकपिटमध्ये काम करणाऱ्या वैमानिकांसाठी स्वतंत्र स्वसंरक्षण प्रशिक्षणाची तरतूद नाही. ‘कॉकपिटमधील एखादा वैमानिक असमर्थ ठरल्यास त्याला बाहेर कसे काढायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, वैमानिकावरच हल्ला झाल्यास स्थिती कशी हाताळायची, यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण नाही.

दोन वैमानिक एकमेकांवर हल्ला करतील, अशी परिस्थिती अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे स्वसंरक्षण प्रशिक्षणापेक्षा विमानात स्काय मार्शलची व्यवस्था अधिक परिणामकारक ठरू शकते,’ असे मतही काही वैमानिकांनी व्यक्त केले आहे. वैमानिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते. मात्र, वैमानिक एकमेकांवर विश्वास ठेवून जबाबदारी सांभाळतात, हे गृहीत धरलेले असल्याने हल्ला सहवैमानिकाकडूनच झाल्यास अशा प्रशिक्षणाचा किती उपयोग होईल, याबाबत देखील साशंकता व्यक्त होत आहे. वैमानिकांची सायकोमेट्रिक चाचणी केवळ नियुक्तीवेळी न घेता ठरावीक कालावधीनंतर पुन्हा घ्यावी, अशी सूचनाही पुढे आली आहे.

वैमानिकांवरील तणाव आणखी वाढेल

वारंवार मानसिक चाचण्या, तपासण्या आणि अतिरिक्त मूल्यांकनांचा अतिरेक झाल्यास त्याचा वैमानिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. व्यावसायिक विमानसेवा व लष्करी विमानसेवा यांचे स्वरूप वेगळे असते. केवळ वैयक्तिक मानसिक स्थितीकडे पाहून चालणार नाही; तर सलग रात्रीचे सत्र व पहाटेचे सत्र, बदलते वेळापत्रक, विविध देशांतील वेळ क्षेत्र व कामाचा दबाव यासारख्या घटकांचा वैमानिकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.