मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरमधील चैत्यभूमी येथे शनिवारी दाखल झाले. भीम गीतांचे सूर आळवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून अनुयायांचे जत्थेच्या जत्थे चैत्यभूमीच्या दिशेने जात होते. शनिवारी पहाटेपासूनच लहान मुलांसह वयोवृध्दांनी तासन् तास रांगेत उभे राहून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षितांसाठी केलेले कार्य, तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंबेडकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असलेल्या आदरापोटी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून अनुयायी दादरमध्ये आले होते. अनेकजण शुक्रवारीच दादरमध्ये दाखल झाले. दलित साहित्यातील शेकडो पुस्तकांचे स्टॉल शिवाजीपार्क परिसरात उभारण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणाऱ्या विविध पुस्तकांच्या खरेदीसाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.
जागोजागी डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा, मूर्ती विकणाऱ्या विक्रेत्यांनी रस्ते व्यापले होते. काही अनुयायी अभिवादनानंतर जाण्या-येण्याच्या मार्गावर भीम गीते गाऊन आंबेडकरी विचारांचा जागर करीत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात आले होते.
या प्रदर्शन दालनात आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील अनेक दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली होती. तसेच, विविध स्वयंसेवा संस्थांनी महापालिकेला सहकार्य करत विविध सुविधा पुरविल्या. सामाजिक संस्थांनी मोफत वैद्यकीय शिबीर, नेत्रतपासणीसह जेवणाचीही सोय केली. अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, शौचालये, जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तसेच, अग्निशमन दलाचे जवानही तैनात होते. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारीही सेवा बजावत होते.
