मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी १५ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली. त्याअंतर्गत विविध ठिकाणांहून दुधाचे १०६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात विविध नामांकित कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या ६८० आणि सुट्या दुधाच्या ३८२ नमुन्यांचा समावेश आहे.

राज्यात दूध भेसळखोरांना जरब बसण्यासाठी आणि राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम आणि आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात व्यापक दूध सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकाच वेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दुधाचे नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची सूचना १०३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना करण्यात आली होती.

हेही वाचा >>>शिरसाट यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी

त्यानुसार १५ जानेवारीपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांमधून दुधाचे एकूण १०६२ नमुने विश्लेषणासाठी घेतले.

दुधाचे नमुने भेसळ, रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या नमुन्यांच्या विश्लेषणानंतर दुधात भेसळ असल्याचे आढळल्यास संबंधित उत्पादक आणि पुरवठादारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा >>>शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर; तपासासाठी दहा पथके ; एक कोटीची मागणी करत सैफवर हल्ला

सहकार्याचे आवाहन

नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचे आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदत क्रमांक १८००२२२३६५ वर त्वरित संपर्क साधावा किंवा ई-मेल jc- foodhq@gov. in वर किंवा https:// foscos. fssai. gov. in/ consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन राजेश नार्वेकर यांनी केले आहे

दुधातील भेसळ ही गंभीर समस्या असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मुख्यमंत्री, विभागाचे मंत्री व राज्यमंत्री यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेत, भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यभरात दुधाचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली. तसेच अशा प्रकारची मोहीम वारंवार राबविण्यात येईल.– राजेश नार्वेकर, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Story img Loader