बिबटय़ांसाठी फुटबॉल, बसण्यासाठी स्टूल!

बिबटय़ाची ही करुणकथा संपविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक प्रयोग राबविण्यात आला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मोठय़ा पिंजऱ्यातील मुक्त वावराने मन:स्वास्थ्यात सुधार
जंगलातील चपळ प्राण्यांमध्ये गणला जाणारा बिबटय़ा चुकूनमाकून मानवाच्या वस्तीत येतो वा अंधाऱ्या रात्रीत अंदाज न आल्याने विहिरीत पडतो; मग माणसांना धोका नको म्हणून त्याला बंदिवान केले जाते आणि बिबटय़ाचा सारा जीवनक्रमच कोलमडून पडतो. पिंजऱ्यात तगमग, काही दिवसांनी आक्रमक होऊन पिंजऱ्याच्या गजांवर झडपा घालून स्वत:ला रक्तबंबाळ करून बिबटय़ाचा आयुष्याचा एकेक दिवस कमी करत जातो. बिबटय़ाची ही करुणकथा संपविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक प्रयोग राबविण्यात आला. बिबटय़ांना मोकळे अवकाश मिळावे यासाठी आणि त्याचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार केला. यात आता बिबटे बरेच रमले आहेत.
मुंबईचे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ हे जवळपास १२५ चौरस किलोमीटर पसरलेले जंगल असून येथे ५२ बिबटे असल्याचा अंदाज आहे. यापैकी १७ बिबटे हे जखमी झाल्याने, आजारी पडल्याने, विहीरीत पडल्याने किंवा अन्य कारणांमुळे सध्या बंदिवानात आहेत. पिंजऱ्यात बंदिस्त ठेवले तर तो चिडखोर होतो. त्याचा त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन तो आजारी पडतो. याच आजारपणात त्यांचा मृत्यूही होतो. म्हणूनच येथील बिबटय़ांना खेळता, बागडता यावे यासाठी सहा महिन्यांपूर्वी उद्यान प्रशासनाने एक अभिनव प्रयोग राबविला. बिबटय़ांच्या बंदिस्त खोल्यांना लागूनच मोठे पिंजरे उभारून त्या ठिकाणी फुटबॉलसारखी खेळणी, लाकडी ओंडके, बसण्यासाठी स्टूल अशी सोय करण्यात आली होती. या पिंजऱ्यांमध्ये बिबटय़ांना मनसोक्त फिरता येते. त्याचबरोबर इथल्या खेळण्यांमुळे त्यांचा वेळही तसा मजेत जातो आहे.
‘राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’च्या नियमांप्रमाणे कोणतेही जंगली जनावर तीन महिने बंदिस्त राहिल्यास त्यांना जंगलात सोडता येत नाही. तीन महिन्यांहून अधिक काळ बंदिस्त राहिल्याने उद्यानातील या १७ बिबटय़ांनाही पुन्हा उद्यानात सोडण्यात आलेले नाही. या बिबटय़ांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू नये व त्यांचा खेळकरपणा आणि तंदुरुस्तपणा टिकून राहावा यासाठी उद्यान व्यवस्थापनाने त्यांच्यासाठी हा विशेष प्रयोग राबवला आहे.
जणू छोटेखानी जंगलच
बिबटय़ांचे मृत्यू थोपविण्यासाठी उद्यान व्यवस्थापनाने मूळच्या १० बाय १५ फुटांच्या बंदिस्त पिंजऱ्यामागे २० मीटर रुंद व ३० मीटर लांबीचा मोठा पिंजरा तयार केला. यात सध्या प्रत्येक मोठय़ा पिंजऱ्यात दोन याप्रमाणे सतरा बिबटय़ांना नऊ पिंजऱ्यांमध्ये नरासोबत नर आणि मादीसोबत मादी असे ठेवण्यात आले आहे. हा मोठा पिंजरा म्हणजे या बिबटय़ांचे छोटेखानी जंगल बनले आहे. यात पाणवठा तसेच बिबटे खातील अशा औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. याचबरोबरीने झाडावर चढण्याची हौस पूर्ण व्हावी यासाठी लांबलचक उंचावर बांधलेला लाकडी ओंडका, टेबल व स्टूल ठेवण्यात आले. विशेष म्हणजे एक फायबरचा मोठा चेंडूदेखील ठेवण्यात आला असून विरंगुळ्यासाठी हे बिबटे या चेंडूशी खेळण्यात हल्ली मग्न असतात.

एकही बिबटय़ा आजारी नाही
बिबटय़ा हा प्रचंड हालचाल करणारा व धावपळ करणारा प्राणी असून त्याला बंदिस्त केल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी त्यांच्यासाठी जंगलाचा अधिवास निर्माण करून त्यांचे उर्वरित आयुष्य चांगले जावे यासाठी ही सुविधा केली. याचे फार चांगले परिणाम समोर आले असून गेल्या काही महिन्यांत एकही बिबटय़ा आजारी पडलेला नाही.
– डॉ. शैलेश पेठे, पशू वैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संकेत सबनीस

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Football for leopard in sanjay gandhi national park