घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात मुली पळवून आणण्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. अभिनेत्री प्राची देसाईच्या एका डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना दमबाजी करुन आठव्या थरावरुन खाली उतरवलं. दहीहंडी उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी राम कदम यांनी अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित केलं होतं.

अभिनेत्री प्राची देसाईने सुद्धा कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी समोर असलेल्या उपस्थित गर्दीला उद्देशून ती ‘बोलबच्चन’ सिनेमातला एक डायलॉग बोलत होती. प्राचीने डायलॉग बोलायला सुरुवात केली इतक्यात एक गोविंदा पथक मानवी मनोरे रचून हंडीच्या जवळ पोहोचले. सर्वात वरच्या आठव्या थरावरचा गोविंदा हंडी फोडणार इतक्यात राम कदम यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

राम कदम यांनी दमबाजीच्या स्वरात त्या गोविंदाना खाली उतरण्यास सांगितले. मी तुम्हाला योग्यवेळी सूचना देईन तेव्हाच हंडी फोडा असे कदम या गोविंदांना अधिकारवाणीच्या स्वरात म्हणाले. बिचारे गोविंदाही निमूटपणे खाली उतरले. खरंतर कदम त्यावेळी प्राची देसाईचा डायलॉग थांबवू शकत होते. तेच व्यवहार्य सुद्धा होतं. पण मुंबईतल्या भाजपाच्या या डॅशिंग, दयावान आमदाराने धाडस, हिम्मत दाखवून आठ थर रचणाऱ्या गोविंदांना खाली उतरवलं. आधीच मुली पळवून आणण्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या राम कादम यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

पाहा व्हिडिओ

जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट केला व्हिडिओ
राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी क्राँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून राम कदम यांचा एक व्हिडीओ ट्विट करत हा आरोप केला आहे.

राम कदम यांच्या भाषणाची क्लिप शेअर करत आव्हाड म्हणतात, ‘बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी कदम यांच्यावर टीका केली. कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.