घर घेण्याची सुवर्णसंधी… मुंबईपासून हाकेच्या अंतरावर १५ लाखांमध्ये ५५७ स्वेअर फुटांच्या फ्लॅट्सची होणार विक्री

मुंबईपासून जवळच आणि अगदी चांगल्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या या १० ते १५ लाखांमधील घरांचा बिल्डअप एरिया हा ५५७ स्वेअर फूट इतका आहे.

Home
ठाण्यातील कासारवडवलीमध्ये उपलब्ध आहेत ही घरं (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या आकाशाला भिडलेल्या किंमती पाहून अनेक सर्वसामान्य कुटुंबांना आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. पण आता हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे. काहींना बातमीचा मथळा वाचून धक्का बसेल पण ही बातमी खरी आहे. मुंबईपासून जवळच १५ लाखांमध्ये घरं उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर अगदी १० लाखांपासून घरं उपलब्ध करुन देण्यात आलीय. विशेष म्हणजे या घरांची विक्री करणारी संस्था ही फारच विश्वासार्हता असणारी संस्था आहे. मुंबईपासून जवळच आणि अगदी चांगल्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या या १० ते १५ लाखांमधील घरांचा बिल्डअप एरिया हा ५५७ स्वेअर फूट इतका आहे. अशाचप्रकारे ६९८ स्वेअर फूट एरिया असणारी घरं १८ लाख ८४ हजारांपासून उपलब्ध आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३७० स्वेअर फुटांचं घर हे अवघ्या ९ लाख ९८ हजारांना आणि ते ही मुंबईपासून जवळच उपलब्ध आहे. चला आता नक्की ही घरं कुठे आहेत आणि कोण विकत आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

वरील सर्व घरं ही ठाण्यातील घोडबंदर येथे उपलब्ध आहेत. या घरांची विक्री म्हाडाच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हाडाच्या कोकण बोर्डाकडून या घरांची विक्री केली जाणायर. कोकण बोर्डाने ८ हजार ९८४ घरं विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

ठाण्यातील कासारवडवलीमध्ये ५५७ स्वेअर फूट बिल्डअप एरिया असणाऱ्या घरांची विक्री केली जाणार आहे. तर या ठिकाणी लहान आकाराची घरं ही ३७७.६५ स्वेअर फुटांची असणार आहेत. कासारवडवलीमध्येच ७२२ स्वेअर फूट आणि ३९६ स्वेअर फुटांच्या घरांचीही विक्री केली जाणार आहे. ठाण्यामधील वडवली येथे १७ ते १८.८४ लाखांदरम्यान घरांची विक्री केली जाणार असून या घरांचा बिल्डअप एरिया हा ६३० ते ६९८ स्वेअर फूट असून कार्पेट एरिया हा ४०० ते ५१५ स्वेअर फूट असणार आहे.

ठाणे, कल्याण, वसई-विरार, मीरा-भाईंदरमध्ये ही घरं आहेत. मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. या सोडतीची इच्छुकांना मोठी प्रतीक्षा असते. मात्र मागील दोन वर्षांपासून मुंबई मंडळाची, तर तीन वर्षांपासून कोकण मंडळाची सोडत निघालेली नसताना यंदा मात्र मोठ्या संख्येने घरांची सोडत काढण्यात आलीय. परवडणाऱ्या घरांची मोठय़ा संख्येने मागणी असताना सोडत निघत नसल्याने इच्छुकांकडून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर अखेर कोकण मंडळाने घरे शोधून दसऱ्याच्या दिवशी सोडत काढण्याचा निर्णय घेतला. सोडतीत सहभागी होणाऱ्या पात्र अर्जदारांची यादी जाहीर करून १४ ऑक्टोबरला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार असल्याचं म्हाडाने स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत या आठ हजार ९८४ घरांसाठी २६ हजारांहून अधिक अर्ज आलेत.

कशी करता येणार नोंदणी?

२३ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणीस सुरुवात झालीय. याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणीधारकांना अर्ज भरून तो बँकेकडे अनामत रकमेसह सादर करता येईल असं म्हाडाने म्हटलं होतं. नोंदणी केल्यानंतरच अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे २४ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर (रात्री १२ वाजेपर्यंत) पर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर नोंदणी बंद होईल आणि पुढे नोंदणी केलेल्यांनाच २३ सप्टेंबपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर अनामत रकमेसह तो बँकेकडे सादर करण्याची अंतिम मुदत २४ सप्टेंबर असेल. त्यानंतर ही प्रक्रिया बंद होईल. पुढे सोडतीत सहभागी होणाऱ्या पात्र अर्जदारांची यादी जाहीर करून १४ ऑक्टोबरला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येईल, असेही महाजन यांनी सांगितले.

एकूण घरे ८९८४

  • २३ ऑगस्टला जाहिरात
  • २४ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणी
  • २२ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत
  • २४ ऑगस्टला दुपारी ३ वाजल्यापासून अर्जविक्री-स्वीकृती
  • २३ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार
  • २४ ऑगस्ट अनामत रकमेसह अर्ज बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारीख
  • १४ ऑक्टोबरला काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सोडत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: For rs 15 lac a 557 sq ft home near mumbai mhada kokan thane lottery scsg