‘सीईओ’साठी नव्याने जाहिरात

अनुभवी डॉक्टरांचा या पदासाठी विचार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| शैलजा तिवले

माजी अधिष्ठात्यांकडून प्रतिसाद नाही; पदाची अर्हता बदलण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबई : पालिका रुग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी माजी अधिष्ठातांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा नव्याने जाहिरात काढण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. त्यामुळे आता अनुभवी डॉक्टरांचा या पदासाठी विचार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिकेच्या मुख्य रुग्णालयांवरील रुग्णांचा भार दिवसेंदिवस वाढत असून यामुळे अधिष्ठात्यांवरील प्रशासकीय कामांची जबाबदारीही वाढली आहे. अधिष्ठाता हे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर असूनही ते प्रशासकीय कामांमध्ये गुंतून पडल्याने त्यांना वैद्यकीय सेवा किंवा प्रशिक्षण देणे शक्य होत नाही.

रुग्णालयातील प्रशासकीय कामांचा भार अधिष्ठात्यांच्या खांद्यावरून कमी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) नेमणूक करण्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केईएम रुग्णालयाच्या भेटीच्या वेळेस जाहीर केले होते.

सीईओ पदावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया लांबल्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये पालिकेने अंतरिम सीईओची नियुक्ती केली होती. सीईओ पदासाठी माजी अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याचा ठराव झाल्यानंतर जाहिरातही पालिकेने काढली होती. परंतु या जाहिरातील योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. परिचारिका आणि अन्य माजी वैद्यकीय अधिकारी यांनी या पदासाठी अर्ज केले होते. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्यात येणार आहे.

यावेळेस पदासाठी आवश्यक अर्हतेमध्ये बदल करण्यात येतील. अनुभवी डॉक्टर, रुग्णालय प्रशासनाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांचा पदावर नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार नवीन जाहिरात लवकरच काढली जाणार असल्याचे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

‘माजी वैद्यकीय अधीक्षक पदासाठी पात्र’

अधिष्ठाताच्या हाताखाली सीईओ काम करणार आहे. माजी अधिष्ठाता त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने कमी असलेल्या व्यक्तीच्या आदेशानुसार काम करण्यास तयार होणार नाहीत. त्यात केवळ ८० हजार वेतन घेऊन सर्व प्रशासकीय कामांचा ताण घेण्यासाठीही ते इच्छुक नाहीत. त्यामुळे या पदासाठी माजी अधिष्ठाता अर्ज करणे ही कल्पनाच मुळात कोणताही विचार न करता केलेली होती. या पदावर माजी साहाय्यक अधिष्ठाता किंवा माजी वैद्यकीय अधीक्षक या पदावरील व्यक्ती योग्यरीतीने काम करू शकतील, असे मत पालिका रुग्णालयांमधील माजी अधिष्ठात्यांनी व्यक्त केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: For the post of chief executive officer of municipality hospital ceo new add akp

ताज्या बातम्या