घराच्या खिडकीतून पक्ष्यांना खाद्य देण्यास मज्जाव

शहा यांच्या दाव्यानुसार, पक्ष्यांसाठी खाणे आणि पाण्याची सोय म्हणून २००९ मध्ये ठाकूर यांनी आपल्या खिडकीबाहेर छत बांधले.

वरळीतील कुटुंबाला शहर दिवाणी न्यायालयाचे आदेश

मुंबई : इमारतीतील रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत पक्षीप्रेमी आणि त्याच्या कुटुंबीयांना घराच्या खिडकीतून पक्ष्यांना खायला घालण्यास शहर दिवाणी न्यायालयाने कायमस्वरूपी मज्जाव केला आहे. करुणेच्या भावनेतून पक्ष्यांना खायला घालण्याची कृती प्रशंसनीय आणि सन्मान करण्यासारखी आहे. असे असले तरी या कृतीने शेजाऱ्यांना त्रास होऊ न देणेही महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

वरळी येथील ‘व्हिनस’ सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या दिलीप आणि मीना शहा या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याने पद्म आणि जिगीषा ठाकूर या दाम्पत्याविरोधात शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. खिडकीतून पक्ष्यांना खायला घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे इमारतीतील रहिवाशांना खूप त्रास होत असल्याचा दावा त्यांनी के ला होता. तसेच पक्ष्यांना खायला घालण्यापासून ठाकूर कु टुंबीयांना कायमस्वरूपी मज्जाव करण्याची मागणी केली होती.

शहा यांच्या दाव्यानुसार, पक्ष्यांसाठी खाणे आणि पाण्याची सोय म्हणून २००९ मध्ये ठाकूर यांनी आपल्या खिडकीबाहेर छत बांधले. हे छत आपल्या घराच्या खिडकीवर होते. ठाकू र कु टुंबीयांकडून छतावर खाद्यान्न टाकले जात असल्याने मोठय़ा प्रमाणावर पक्षी तेथे जमा होत. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे दरुगध पसरत असे. अनेकदा धान्यातील कीटक शहा यांच्या खिडकीतून घरात शिरत. सुरुवातीला शहा दाम्पत्याने ठाकूर कुटुंबीयांशी सामंजस्याने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकूर कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष के ले. अखेर सोसायटीच्या माध्यमातून शहा कुटुंबीयांनी ठाकूर कुटुंबाला याबाबत पत्रव्यवहार केला. त्यावर प्रतिसाद देताना शहा कुटुंबीयांनी पक्ष्यांना खायला देण्याने त्रास होऊ शकतो हे कबूल केले. परंतु पक्ष्यांना खायला घालणे हे काही बेकायदा कृत्य नाही. त्यामुळे हे काम आपण सुरूच ठेवणार असल्याचे कळवले. त्यावर शेजाऱ्यांना त्रास होत असल्याने शहा कुटुंबीयांना या कामासाठी इमारतीची सामाईक जागा वापरण्याची सूचना सोसायटीने त्यांना केली. शिवाय इमारतीतील कोणीही सदस्य घराच्या खिडकीतून पक्ष्यांना खायला देणार नाही, असा ठरावही मंजूर केला. सगळे प्रयत्न फसल्यानंतर शहा दाम्पत्याने अखेर न्यायालयात धाव घेतली.

दाव्याला विरोध करताना शहा दाम्पत्यावरच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी ठाकूर कु टुंबीयांनी के ली. मात्र, पक्ष्यांची विष्ठा आणि गोंधळामुळे इमारतीतील अन्य रहिवाशांना त्रास होऊ शकतो, असा निष्कर्ष अतिरिक्त न्यायाधीश ए. एच. लड्ढा यांनी घराच्या खिडकीतून पक्ष्यांना खायला घालण्यास शहा कु टुंबीयांना कायमस्वरूपी मज्जाव केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Forbidden feed birds window house ssh

ताज्या बातम्या