अनिश पाटील, लोकसत्ता

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पकडण्यात आलेल्या सुमारे पावणेचार कोटी रुपयांच्या परदेशी चलनामागे सराईत टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. अटक आरोपीने आतापर्यंत किमान १२ वेळा परदेशी नोटांची तस्करी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. ‘ऑपरेशन चेक शर्ट्स’अंतर्गत डेटा विश्लेषणाचा वापर करून डीआरआयने भारताबाहेर परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केली होती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ नोव्हेंबरला सकाळी शारजाला जाणाऱ्या रोशन घाडी (३०) व वासिम सोलकर (३१) या दोन प्रवाशांना डीआरआयने विमानतळावर थांबवले होते. त्या वेळी त्यांच्याकडील बॅगेच्या तळाशी पाच लाख ८०० अमेरिकन डॉलर्स व ८० हजार यूएई दिरहम असे एकूण तीन कोटी ६७ लाख ७४ हजार रुपये किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले होते.

या प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या विदेशी चलनप्रकरणी सीमा शुल्क कायदा १९६२ च्या कलम ११० अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना या कामासाठी ३५ हजार रुपये मिळणार होते. त्यांना पैशांनी भरलेल्या बॅग दिल्याप्रकरणी डीआरआयने पुढे हरीश राऊत(३८) याला अटक केली.

यामागे मोठी यंत्रणा कार्यरत असून त्यांचा सर्व समन्वय व्हॉट्सअ‍ॅपवरून चालायचा, असे आरोपींच्या चौकशीतून समोर आले. त्या माध्यमातून डीआरआयने आरोपींचा साथीदार परवेंदर सिंह याला ताब्यात घेतले. तपासणीत त्याने मोबाइलमधील सर्व व्यवहारांची माहिती नष्ट केल्याचे निष्पन्न झाले. सिंह हा या टोळीच्या महत्त्वाचा सदस्य असून यापूर्वी तो किमान १२ वेळा परदेशी चलनासह परदेशात गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो आठ वेळा बँकॉक व चार वेळा शारजामध्ये गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सिंह याला मंगळवारी डीआरआयने अटक केली. परदेशी चलनासह जप्त केलेल्या चार बॅगा सिंह यानेच खरेदी केल्या होत्या. या टोळीमधील आणखी एका महत्त्वाच्या सदस्याची माहिती डीआरआयला मिळाली असून आरोपीने घाडी व सोलकर याला या कामासाठी ३५ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. याप्रकरणी सध्या त्याचा शोध सुरू आहे.