Premium

तोतया सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून २६ लाखांच्या परदेशी चलनाची लूट, मुंबई विमानतळावर घडला प्रकार

सीमा शुल्क अधिकारी असल्याचा बनाव करून तोतयाने तामिळनाडूतील व्यावसायिकाकडील २६ लाख रुपये किमतीचे परदेशी चलन लुटल्याचा प्रकार मुंबई छत्रपती विमानतळावर घडला.

custom officer foreign currency
(फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

मुंबई : सीमा शुल्क अधिकारी असल्याचा बनाव करून तोतयाने तामिळनाडूतील व्यावसायिकाकडील २६ लाख रुपये किमतीचे परदेशी चलन लुटल्याचा प्रकार मुंबई छत्रपती विमानतळावर घडला. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात सहार पोलीस ठाण्यात फसवणूक, तोतयागिरी व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तक्रारदार शौरभ हुसेन तामिळनाडू येथील रहिवासी असून त्यांचा मौल्यवान खडे विकण्याचा व्यवसाय आहे. हुसेन यांनी नुकतेच जयपूर येथील ग्राहकाला मौल्यवान खडे विकले होते. त्या बदल्यात त्यांना २५ हजार अमेरिकन डॉलर्स मिळाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती रक्कम घेऊन हुसेन २६ मे रोजी मुंबईत आले होते. दुबईला जाणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीला परदेशी चलनाची आवश्यकता होती. त्यामुळे हुसेन यांनी मैत्रिणीला देण्यासाठी २५ हजार यूएई दिऱ्हाम घेऊन ३० मे रोजी मुंबई विमानतळावर आले होते. तसेच हुसेन यांनी २५ हजार अमेरिकन डॉलर्स बॅगेत ठेवले होते. ते विमानतळावरील  पी-१० निर्गमन परिसर येथे उभे असताना दोन पुरूष व एक महिला त्यांच्याजवळ आली. त्यांनी आपण सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच चौकशीसाठी हुसेन यांना सोबत घेऊन ते विमानतळावरील उद्यान परिसरात गेले. तुम्ही परदेशी चलनाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्याचे हुसेन यांना त्यांनी सांगितले. याप्रकरणी तुमची झडती घ्यायची असल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. ते तिघेही हुसेन यांच्या बॅगची तपासणी करू लागले.

हेही वाचा >>> मुंबई : शासनाची मान्यता असूनही एकल इमारत पुनर्विकासास म्हाडाचा नकार

त्यानंतर हुसेन यांची झडतीत घेतली असता त्यांच्या खिशात २५ हजार यूएई दिऱ्हाम सापडले. त्याच्या पावतीबद्दल विचारले असता तक्रारदारांनी आपल्याकडे सध्या ती नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने बॅगची स्कॅनरमध्ये तपासणी करायची असल्याचे सांगून ती घेऊन गेला. त्यात २५ हजार अमेरिकन डॉलर्स होते. दुसरी व्यक्तीही तेथून हळूच गायब झाली. त्यावेळी हुसेन यांनी महिलेला पकडले असता तिला एक दूरध्वनी आला. दूरध्वनीवरील व्यक्तीने महिलेला सोडल्यास २५ हजार अमेरिकन डॉलर्स (२० लाख रुपये) व २६ हजार यूएई दिऱ्हाम (सहा लाख रुपये) परत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी महिलेला सोडले. त्यानंतर १५ ते १६ तास वाट पाहिल्यानंतरही संबंधित व्यक्ती व महिला परदेशी चलन घेऊन आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे हुसेन यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी सहार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक, तोतयागिरी करणे व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 18:47 IST
Next Story
भरपत्रकार परिषदेत ‘त्या’ खासदाराचं नाव घेताच तुम्ही का थुंकलात? संजय राऊतांनी सांगितलं कारण, म्हणाले…