मुंबई : इराण-अमेरिका संघर्षाची धग आजही कायम असल्याने पूर्वीप्रमाणे विमानांची वाहतूक सुरू झालेली नाही. युद्धामुळे सर्वाधिक फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. विमान इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया यामुळे शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थाच्या पालकांवर अतिरिक्त भार पडला आहे. युरोप, अमेरिकेला जाणाऱ्या मुलांना पूर्वीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के अधिक दराने विमान तिकिटे घ्यावी लागत आहेत, तर आशियाई देशांसाठी तिकिटांचा खर्च अंदाजे २५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातच अनेक देशांनी व्हिसा नियमात बदल केल्याने शुल्क वाढले आहे. त्यामुळे पालकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
अमेरिकेचे पश्चिम आशियातील युद्ध, दीर्घकाळ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढत्या इंधन खर्चाच्या एकत्रित परिणामांमुळे विमानांच्या उड्डाणांची संख्या घटली आहे. त्यातच वळण मार्गांमुळे हवाई प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढला आहे. यामुळे विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च आणि पर्यायाने एकूण खर्च वाढला आहे. परिणामी, विद्यार्थी आणि पालक शिक्षणासंबंधीच्या निर्णयांचा आणि गुंतवणुकीचा पुनर्विचार करत आहेत. विमान प्रवासाच्या वाढलेल्या खर्चामुळे राहण्याच्या खर्चासाठी वाचवलेले पैसे कमी होतात. त्यामुळे हे विद्यार्थी पर्यायी देशांचा शोध घेत आहेत.
विशेषतः युरोपमधील देशांमध्ये एकूण खर्च कमी आहे. सर्वाधिक समस्या अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. व्हिसाच्या मुलाखतीची वेळ मिळत नसल्याने अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आयत्यावेळी व्हिसा मंजूर होऊन तिकिटे काढायचे झाल्यास खर्च वाढतो. इंधन दर वाढल्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा या देशांमधील प्रवास दीड लाखांपर्यंत महागला आहे. युरोपातील देश, त्यातही इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडा येथे विद्यार्थी प्राधान्याने जातात.
भारतातून परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थी प्रामुख्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परदेशात जातात. याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही काही विद्यार्थी दुसऱ्या सत्रामध्ये परदेशात जातात. अमेरिकेत ऑगस्ट-सप्टेंबर, तर ब्रिटन आणि कॅनडामध्ये सप्टेंबर महिन्यात सत्र सुरू होते. भारतातून परदेशात शिक्षणासाठी सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी जातात. त्यापैकी १५ ते २० हजार विद्यार्थी महाराष्ट्रातून जातात.
प्रतिक्रिया इराण-अमेरिका युद्धामुळे विमान तिकिटांचे दर वाढले आहेत. अनेक मार्गावरील विमानांच्या तिकिटांत ४० टक्के वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचा खर्च वाढला आहे. एका विद्यार्थ्यांला महिन्याला ५०० डॉलर खर्च येत होता. तो आता ५० टक्यांनी वाढला आहे. त्यातच विद्यार्थी शिक्षणासाठी कर्ज घेतात. परदेशात नोकरी करून कर्ज फेडू असा अनेक मुलांचा विचार असतो. परंतु आता व्हिसाचे नियम बदलल्याने दोन वर्षाऐवजी एकच वर्ष नोकरी करता येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा भंग होत आहे.- प्रा. जी. डी. यादव, शिक्षणतज्ञ
शिक्षणासाठी अमेरिकेला जाणारे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना व्हिसासाठी अर्ज करण्याची वेळ मिळत नाही. यावर्षी अमेरिकेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिसा नाकारण्याचा दर तब्बल ६१ टक्के आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला जात आहे. अगदी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सध्या व्हिसा मिळत नाही. याशिवाय, विमान इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमान तिकिटाचा खर्चही वाढला आहे. एकूणच, शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी सध्या मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही अडचणींचा सामना करत आहेत. – बख्तावर कृष्णन, संचालक ‘इन्स्पायर्स एज्युकेशन’
मार्ग———-ऑगस्ट २०२५————— ऑगस्ट २०२६
मुंबई ते लंडन —-४० हजार———–७५ हजार मुंबई ते रशिया—३५ हजार————-७०हजार
मुंबई ते न्यू यॉर्क—६५ हजार———— ८५ हजार
