मुंबई: परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या हजारो विद्यार्थांना मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दारात अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात परदेशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरील लेखा विभागात (४३१) केली जाते. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे राज्यातील सरासरी ९० हजार विद्यार्थी विविध देशांतील विद्यापीठांमध्ये दरवर्षी प्रवेश घेत असतात. संपूर्ण देशात राज्यातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थांची संख्या सर्वाधिक आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला कागदपत्रे वकीलाकडून सत्यापित करुन घ्यावी लागतात. त्यानंतर ती गृह विभागाला सादर केली जातात. गृह विभागाच्या पडताळणीनंतर या कागदपत्रांवर अधिकृत शिक्का मारला जातो.
ही कागदपत्रे अंतिम पडताळणीसाठी मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे विद्यार्थांना घेऊन यावे लागते. चौथ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक ४३१ मध्ये ही प्रक्रिया पार पडते. या ठिकाणी या विद्यार्थांना पुन्हा एका नवीन परिक्षेचा सामना करावा लागतो. लेखा विभागाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या दोन बाकांवर जेमतेम सात आठ विद्यार्थी बसू शकतात. पडताळणीसाठी आलेल्या विद्यार्थांची संख्या शेकडो असते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारे हे विद्यार्थी कक्षासमोरील व्हरांडयात मांडी घालून बसलेले दिसतात. यात झेन जी तरुण मुली मुलांचा समावेश जास्त असतो. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यांगतांची संख्या जास्त असते.
या गर्दीत व्हरांडयात बैठक मारुन बसलेल्या या विद्यार्थांना अनेक अभ्यांगताच्या पायांचा प्रसाद बसतो. रांगेत तासनतास उभे राहिल्यानंतर कागदपत्र घेऊन पडताळणीसाठी लेखा विभागात गेल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटी तेथे सांगितल्या जातात. तोपर्यंत दिवसभर उपाशी पोटी रांगेत उभे राहून विद्यार्थी त्रस्त झालेले असतात. या त्रुटी अगोदर सांगितल्या गेल्या असत्या तर त्याच्या पूर्ततेसाठी तात्काळ हालचाल करता येत असे या विद्यार्थींनी सांगितले. कागदपत्रांची पूर्तता करुन पुन्हा त्यांना तोच किचकट मंत्रालय प्रवेश प्रक्रिया, पडताळणीसाठी तासनतास रांगेत उभे राहणे याचा अनुभव घ्यावा लागतो. हे सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर ही कागदपत्रे दिल्लीला परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविता येतात. त्यानंतर विद्यार्थांचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होतो.
नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचा पदवीधर हर्षवर्धन गोळे हा इटलीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहे. कागदपत्रांतील त्रुटी दूर करण्यासाठी त्याला नाशिकहून दोन वेळा मंत्रालयात यावे लागले. नागपूर, पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि राज्यातील इतर भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही असाच अनुभव येतो.विद्यार्थ्यासाठी क्रमांक ४३१ च्या बाहेर स्वतंत्र हेल्प डेस्क, प्राथमिक कागदपत्र तपासणी केंद्र, ऑनलाइन टोकन व्यवस्था आणि आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती उपलब्ध करून देण्याची गरज विद्यार्थांनी व्यक्त केली. अशा सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. परदेशात शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळेल. यासंर्दभात उच्च व तंत्र शिक्षण अवर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्याशी अनेक वेळा संर्पक साधण्याचा प्रयत्न केला गेला पण तो होऊ शकला नाही.
