मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गोल्डन टेम्पल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसोबत झालेल्या भांडणानंतर एका विदेशी नागरिकाने त्यांच्यावर अग्निशामक यंत्राचा (फायर एक्सटिंग्विशर) फवारा उडवला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, मात्र काही तासांतच तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे त्याच्या मृत्यूच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना गोल्डन टेम्पल एक्सप्रेसमध्ये घडली. विदेशी नागरिक मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून दिल्लीला प्रवास करत होता.
गोल्डन टेम्पल एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये एक परदेशी नागरिक प्रवाशांशी वाद घालत असून गोंधळ घालत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) मिळाली होती. माहिती मिळताच आरपीएफचे जवान त्या कोचमध्ये पोहोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्याला इंग्रजीत समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आणखीनच आक्रमक झाला. त्यानंतर त्याने प्रवाशांवर अग्निशामक यंत्राचा फवारा मारला. यामुळे संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी त्याला विरोध केला आणि त्याला मारहाण केली.
ट्रेन सुरत स्टेशनवर पोहोचली तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याला आरपीएफ पोस्टवर आणलं. चौकशीदरम्यान तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं वय अंदाजे ४५ वर्षे होतं. त्याच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही ओळखपत्रे सापडलेली नाहीत. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
