मुंबई : चर्नी रोड येथील वसतिगृहात हत्या झालेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीच्या शवविच्छेदन अहवालात अत्याचाराबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्यामुळे आता न्यायवैद्यक चाचणी अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२ ते १५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून वसतिगृहात हत्येच्या वेळी उपस्थित सर्वाचे जबाबही नोंदवण्यात येणार आहेत.
विद्यार्थिनीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्यामुळे आता याप्रकरणी डीएनए चाचणी अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी नमुने पहिल्या दिवशीच गोळा करण्यात आले होते. आरोपीच्या डीएनएशी त्याची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय आरोपीच्या दूरध्वनीची माहिती घेण्यात आली असून वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत त्याचे दूरध्वनीवरील बोलणे अधिक काळ नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>> चर्नीरोड वसतिगृह हत्या प्रकरण: विद्यार्थिनीच्या खोलीत आरोपीचा पाइपवरून प्रवेश?
वसतिगृहाच्या तळमजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. तसेच तेथील प्रवेशद्वार रात्री बंद केल्यामुळे आरोपीने पाइपवरून पहिल्या मजल्यावर प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तेथील सज्जासारख्या मोकळय़ा जागेवरून तो खोलीत गेला. चौथ्या मजल्यावरील विद्यार्थिनीच्या खोलीत प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या वेळी वसतिगृहात उपस्थित असलेल्या मुलींसह सर्वाचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने सर्वप्रथम मृतदेह पाहिला होता. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तिच्याबरोबर होती. सकाळी मैत्रिणीने तिला अनेक वेळा दूरध्वनी केले. या काळात कुटुंबीयांनीही तिला दूरध्वनी केले होते; परंतु प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिच्या मैत्रिणीने अखेर सायंकाळी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवही तपासली. त्यानुसार ही विद्यार्थिनी वसतिगृहात आल्याची नोंद होती; पण बाहेर गेल्याची कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे तिने खोलीजवळ जाऊन पाहिले असता तिला मृतदेह दिसला. याबाबत तिने वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा >>> “सुरक्षारक्षक तिच्या रुममध्ये जायचा आणि…”, विवस्त्र मृतदेहप्रकरणी भावाचे गंभीर आरोप, म्हणाला…
सकाळी पावणेपाचच्या सुमारास आरोपी सुरक्षारक्षक वसतिगृहातून बाहेर पडल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात दिसत असून वसतिगृहापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यामुळे रात्री साडेअकरा ते पहाटे पावणेपाचच्या दरम्यान आरोपीने मुलीची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी हत्या व बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
गळा आवळून हत्या..
मरिन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता विद्यार्थिनी मृतावस्थेत जमिनीवर पडली होती. गळा आवळून आरोपीने तिची हत्या केली होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात गळा दाबूनच तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या अंगावर गंभीर जखमा नसल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.