रेडिओ कॉलर लावून बिबटय़ाची मुक्तता

सप्टेंबर महिन्यात ‘सी ३२’ या मादी बिबटय़ाने आरेतील रहिवाशांवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले केले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सप्टेंबर महिन्यात आरेतील रहिवाशांवर सातत्याने हल्ले करणारी मादी बिबटय़ा वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर तिच्या बहिणीला म्हणजेच ‘सी ३३’ ला रेडिओ कॉलर लावून मुक्त करण्यात आले आहे. ‘सी ३२’साठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये ‘सी ३३’ अडकली होती.

गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीमध्ये अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याने जंगल भागात घट झाली आहे. परिणामी, अस्वच्छता पसरली असून कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. कुत्रे हे बिबटय़ांसाठी सहज उपलब्ध होणारे खाद्य असल्याने त्यांच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरत आहेत. यातूनच आरेमध्ये मानव-प्राणी संघर्ष वाढीस लागला आहे.

सप्टेंबर महिन्यात ‘सी ३२’ या मादी बिबटय़ाने आरेतील रहिवाशांवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले केले. तिला पकडण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून ठेवले होते. त्यात १ ऑक्टोबरला ‘सी ३३’ ही मादी बिबटय़ा जेरबंद झाली, मात्र तिच्या शरीरावरील ठशांचा अभ्यास केला असता ती संशयित बिबटय़ाची बहीण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ‘सी ३३’ला ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील प्राणिपालन केंद्रात (रेस्क्यू सेंटर) ठेवण्यात आले. ३ नोव्हेंबरला ‘सी ३२’ ही मादी बिबटय़ा पिंजऱ्यात अडकली. त्यानंतर ‘सी ३३’ला मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्त करताना ‘सी ३३’ला रेडिओ कॉलर लावण्यात आली. तिच्या हालचालींचे निरीक्षण वनविभाग आणि ‘वन्यजीव संवर्धन सोसायटी’ करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Forest department released leopard at an undisclosed location with radio collar zws

ताज्या बातम्या