मुंबई : बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिवसेनेला (ठाकरे) अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला असून त्यांनी मंगळवारी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर सामंत यांनी आपल्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे शिवसेनेला (ठाकरे) धक्का मानला जात आहे. ‘बेस्टच्या पतपेढीची निवडणूक हरलो, म्हणून माझा बळी दिला. मला राजीनामा द्यायला लावला, असा आरोप सामंत यांनी यावेळी केला.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षात मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. दादर येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या एका कार्यक्रमात बेस्टच्या कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.

सामंत यांच्याकडे शिवसेनेचे (ठाकरे) उपनेते पदही होते. दादर येथील सूर्यवंशी सभागृहात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंत यांनी समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. सामंत यांना उपनेते पद देण्यात आले. ‘बेस्ट उपक्रमाचे चाक तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू’, असे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

ऑगस्ट महिन्यात बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली. त्यात बेस्ट कामगार सेनेने ठाकरे बंधूंचे पॅनेल उभे केले होते. या पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. या पराभवानंतर सामंत यांनी राजीनामा दिला. त्यानंतरच्या काळात सामंत यांच्या मुलाचेही निधन झाले. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नेमणूक केली.

५१ वर्षांच्या कारकिर्दीचा झिरो केले

मी ५१ वर्षे ‘मातोश्री’बरोबर प्रामाणिकपणे राहिलो आणि ३१ वर्ष बेस्ट कामगार सेनेची धुरा वाहिली. निवडणूक हरलो म्हणून मला त्या पदावरून बाजूला केले. नंतर माझ्या मुलाचे निधन झाले. त्याला एक महिना व्हायच्या आतच पदावर इतरांची नेमणूक केली. माझी ५१ वर्षांची कारकीर्द एका क्षणात शून्य झाली. मी माझे दु:ख पक्षश्रेष्ठींसमोर मांडले होते. तुम्ही महिनाभर थांबू शकला असतात. दुसऱ्यांच्या भावनांशी किती खेळायचे, दुसऱ्यांच्या भावनांची कदर नेत्यांनी नाही, तर कोणी करायची, अशीही खंत सामंत यांनी व्यक्त केली.

दोन भावांना एकत्र करून निवडणूक लढवली हीच माझी चूक झाली. निवडणुकीत पराजय झाला. सोसायटीच्या निवडवणुकीत अनेकदा हरलो. जिंकलो असतो तर दोन्ही भावांनी आपली पाठ थोपटली असती, आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून जिंकलो असे म्हटले असते आणि हरलो तर माझा बळी दिला, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.