राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना देखील भाजपात घेण्याचे प्रयत्न झाले होते. ही माहिती स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (सोमवार) लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली.

तुम्हालाही भाजपात घेण्याचा प्रयत्न होतात का, तशी काही ऑफर आली होती का? या प्रश्नावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “निश्चित होतात, फार गांभीर्याने झाले. २०१४ नंतर एकदा झाला होता, आताही झाला, ते होतात. काही विनोदाने, गंमतीने करतात. आता त्यातलं खरं किती आणि गंमतीने किती हे समजण्याचा मार्ग नाही. पण तसे प्रयत्न होतात. पण मला जावंस वाटलं नाही. भाजपामध्ये जाण्याचा काही प्रश्नच नव्हता.”

“प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले, कारण…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

शिवसेनेशी युती करावी इतका टोकाचा सल्ला देण्याची वेळ तुमच्यावर आली किंवा तुम्ही तो दिला, जो पुढे पाळला गेला. हे काँग्रेसच्या राजकारणातील मोठं स्थित्यंतर होतं, शिवसेनेच्याही होतं हा बदल तुम्हाला का करावासा वाटला आणि आता तो संयोग झाल्यानंतर आता पुन्हा काँग्रेसचा वर्ग म्हणतोय की आमच्यावर अन्यया होतोय, मग हे न्याय अन्यायायाचं गणित तुम्ही कसं मांडणार? या प्रश्नावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.

“२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा चौथा क्रमांक आला हे मान्य करावं लागेल. हे कटू सत्य आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरे त्यांचे सहकारी पक्षाध्यक्ष होते, त्या दोघांनी राजकारणाची दिशा अशी बदलली. वैयक्तिक सूडाचं राजकारण करून, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या सारख्या संस्थांचा वापर करून, खऱ्या अर्थाने साम,दाम, दंड, भेद नीती अंमलात आणून मग काहींना आमीष दिले. काही जणांचे मोठे प्रोजेक्ट करून दिले, काहींना तुरुंगात टाकलं. काहींना धमक्या दिल्या की तुम्ही जर तुमच्या कर्जाची परतफेड नाही केली तर तुमच्या कारखान्याचा लिलाव करू वैगेरे असा खऱ्या अर्थाने त्यांनी साम,दाम, दंड या नीतीचा वापर केला. याचा परिणाम असा झाला की, दोन-तीन महिन्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चित महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मिळून ४० दिग्गज नेते जे आमदार, खासदार, दोन माजी उपमुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, माजी विरोधीपक्ष नेते काही माजी मंत्री होते असे अनेक जण पक्ष सोडून गेले.” असं ते म्हणाले.

आम्हाला कदाचित शपथविधीचं निमंत्रणही नसतं आलं –

तसेच, “पण हे का केलं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आमचे ४४ आमदार निवडून आलेले होते आणि आता सरकार करायचं की नाही, पुन्हा शिवसेना आणि भाजपाचं बिनसलं नसतं. त्यांची तर निवडणूकपूर्व युतीच होती. त्यांनी तर जाऊन शपथ घेतली असती, आम्ही बघत बसलो असतो. आम्हाला कदाचित शपथविधीचं निमंत्रणही नसतं आलं आणि काही करू शकलो नसतो.” असंही त्यांनी बोलून दाखवलं.