मुंबई : बोरिवलीतील प्रभाग क्र. ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी ६० महिला कार्यकर्त्यांसह भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेत्यांकडून संवादात निर्माण झालेली दरी, विकासकामांसाठी मिळत नसलेला निधी, प्रशासनाकडून तक्रारींची दखल घेण्यात होणारी दिरंगाई आदी कारणांमुळे त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये होणारे प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विरोधी पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात सामावून महाविकास आघाडीला कमकुवत करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. गेल्या दोन – अडीच वर्षात अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीला पाठिंबा दिला.त्यानंतर बोरिवली येथील प्रभाग ९ मधील माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनीही गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत ६० महिला कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा झाल्यांनतर आपण तात्काळ पक्ष प्रवेशाला होकार कळविल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले. नगरसेवक असताना सुरुवातीला प्रभागातील अनेक विकासकामांसाठी एकटीने निधी मंजूर करून आणला आणि विकासकामे केली. काँग्रेसच्या नेत्यांकडून मदत मिळाली नाही. तसेच, पक्षातील वरिष्ठांना आपण माहीतही नसावे, त्यांच्याकडून कधी चर्चा – संवाद झाला नाही. विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मंजूर होत नव्हता. पालिकेतील अधिकारीही तक्रारींची दखल घेत नव्हते, विकासकामांना गती देण्यासाठी अखेर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कोरेगांवकर यांनी स्पष्ट केले.

कोरेगांवकर यांनी नगरसेवक असताना त्यांच्या कारकिर्दीत प्रभागात विकासाची विविध कामे केली.तसेच, स्थानिक पातळीवर त्यांचा नागरिक,स्थानिक संस्थांशी दांडगा जनसंपर्क आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी पक्षातील वरिष्ठांकडे नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी विचारणा केली होती.त्यावर आगामी महानगरपालिका निवडणुकीत संधी देण्याबाबत भाजपकडून आश्वासन देण्यात आल्याचे कोरेगांवकर यांनी सांगितले.