मुंबई: ख्रिशन धर्मीय असताना अनुसूचित जातीचे बनावट जात प्रमाणपत्र तयार करून निवडणूक जिंकणाऱ्या एका माजी नगरसेवकाविरोधात तब्बल २४ वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरमधील एका वकील महिलेच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
गोवंडी परिसरात राहणारे रमेश कांबळे यांनी मुंबई महापालिकेची २००२ मधील निवडणूक प्रभाग क्रमांक १९२ मधून लढवली होती. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या प्रभागात त्यांच्या विरोधात रिपाइंचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र राजेंद्र वाघमारे यांचा पराभव करत रमेश कांबळे विजयी झाले होते. रमेश कांबळे हे ख्रिश्चन असताना उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊन ही निवडणूक लढवली होती.
निकालानंतर पराभूत उमेदवार राजेंद्र वाघमारे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत कोकण भवन येथे जात पडताळणीसाठी अर्ज केला होता. जात पडताळणीमध्ये कांबळे हे ख्रिश्चन असल्याचे समोर आले. मात्र कांबळे यांनी याबाबत लघुवाद न्यायालयात धाव घेतली होती. लघुवाद न्यायालयाने कोकण भवन यांनी दिलेला आदेश योग्य असल्याचे सांगत कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राजेंद्र वाघमारे यांना नगरसेवक पद मिळाले होते.
या प्रकरणी कांबळे यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र दोन्ही ठिकाणी कोकण भवन यांचा आदेश योग्य असल्याचा निकाल देण्यात आला. त्यानुसार गुरुवारी याबाबत चेंबूर पोलिसांनी रमेश कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
