scorecardresearch

माजी अग्निशमन प्रमुख शशिकांत काळे बडतर्फ; राष्ट्रपती पदकासाठी खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप सिद्ध

दरवर्षी २६ जानेवारीला गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांचा गौरव करण्यात येतो

राष्ट्रपती पदकासाठी खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप सिद्ध

मुंबई : राष्ट्रपती पदकासाठी राज्य व केंद्र सरकारला खोटी माहिती सादर केल्याच्या प्रकरणावरून वादात सापडलेले माजी अग्निशमन प्रमुख शशिकांत काळे यांना अखेर सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. खात्यांतर्गत सुरू असलेल्या चौकशीत त्यांच्यावरील सर्वच्या सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. पालिकेची प्रतिमा मलीन करण्याबरोबरच,  राज्य सरकार, राज्यपाल व राष्ट्रपतींची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांचा गौरव करण्यात येतो. हा सन्मान मिळविण्यासाठी गेल्यावर्षी तत्कालीन अग्निशमन प्रमुख अधिकारी शशिकांत काळे यांनी अन्य जवानांबरोबरच स्वत:च्या नावाचीही शिफारस केली होती. मात्र स्वत:चे नाव देताना काळे यांनी चुकीची माहिती दिल्याचे आढळून आले. काळे यांनी गेल्या दहा वर्षांतील गोपनीय अहवालांची माहिती देताना ‘अ उत्कृष्ट’ अशी प्रतवारी देण्यात आल्याचे दाखवले होते. काळे यांना २०१४-१५ मध्ये पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र यावर्षीही ‘अ उत्कृष्ठ’ मिळाल्याचे त्यांनी दाखवले होते. ही बाब निर्दशनास आल्यानंतर काळे यांना गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२०मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरून हटवण्यात आले.  या गंभीर प्रकारामुळे काळे यांची सह आयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्यामार्फत खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. तसेच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठवून पदकासाठीची शिफारस तातडीने मागे घेतली होती. काळे यांना उप प्रमुख अग्निशमन अधिकारी पदावर पदावनत करण्यात आले होते. आता वर्षभरानंतर त्यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले असून त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीची पटलावर मांडण्यात आला आहे.

काळे यांनी केलेल्या कृत्यामुळे मुंबई महापालिकेची प्रतिमा मलीन झाली असून प्रशासनाला गेल्यावर्षी पदकासाठीचा प्रस्ताव मागे घेऊन नवीन प्रस्ताव सादर करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यांचे कृत्य हे नैतिक अध:पतन, वरिष्ठांची हेतूपुरस्सर आणि जाणीवपूर्वक, दूरस्थ हेतूने, दिशाभूल, वरिष्ठांचा विश्वासघात तसेच राज्य सरकार, राज्यपाल, राष्ट्रपती यांची दिशाभूल करणारे आहे, असा ठपका या चौकशीत ठेवण्यात आला  आहे.

यापूर्वीही अवैध कृत्ये

काळे यांना आठ वर्षांपूर्वी अग्निशमन दलाचे पेट्रोल अवैधपणे चोरून काळया बाजारात विकल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. दीड वर्षानंतर त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी काळे यांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता, तर माहीम येथील एका इमारतीच्या भोवती सहा मीटर मोकळ्या जागेची अट डावलून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांना निलंबित केले होते.  काळे यांचा पूर्वइतिहास पाहता आतापर्यंत त्यांना चार विविध  गुन्ह्यांसाठी निलंबनाची कारवाई तसेच दंड ठोठावण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former fire chief shashikant kale fake documents akp

ताज्या बातम्या