नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजा घेऊन फरार झालेल्या गुंडास मुंबई गुन्हे शाखा १० च्या पथकाने साकिनाका येथून अटक केली आहे. प्रताप गोडसे (३५) असे या गुंडाचे नाव असून तो गुंड अरूण गवळीच्या टोळीचा आहे.
 २००७ मध्ये गवळी टोळीने शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी एकूण २१ आरोपींना अटक केली होती. ऑगस्ट २०१२ मध्ये मोक्का न्यायालायने प्रताप गोडसे आणि अरुण गवळी यांच्यासह ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिक येथील कारागृहात गोडसे शिक्षा भोगत होता. १ एप्रिल २०१३ रोजी गोडसे संचित रजेवर बाहेर आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार झाला होता. गुन्हे शाखा १० च्या पथकाला गोडसे साकीनाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपिका जहागिरदार, पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर, परशुराम साटम यांच्या पथकाने सापळा लावून गोडसे याला अटक केली.