परमबीर सिंह यांचे चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राव्यतिरिक्त आपल्याकडे आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असे प्रतिज्ञापत्र सध्या फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वकिलाच्या माध्यमातून चांदिवाल आयोगाकडे सादर केले आहे. यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत.

परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे आर्थिक गैरव्यवहारावरून अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचानलयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली. देशमुख यांच्या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपला लक्ष्य करताना केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला असतानाच सिंह यांचे नवे प्रतिज्ञापत्र समोर  आले. पोलिसांच्या नोंदी फरार असलेल्या परमबीर सिंह यांनी वकिलाच्या माध्यमातून हे प्रतिज्ञापत्र सादर केले.

 मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे नाहीत. तसेच या प्रकरणात आपल्याला कोणचीही उलट तपासणी घ्यायची नाही, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या एक सदस्यीय चांदिवाल आयोगासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी संजय पाटील व सचिन वाझे यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरावे, असे सिंह यांनी म्हटले आहे. कोणताही नवा पुरावा नाही आणि उलट तपासणीसाठीही तयार नाही, असे सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केल्याचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले. 

आरोप काय?

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला प्रतिमहिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगर्तंसह कोश्यारी यांना लिहिले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मार्चमध्ये निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांचा एक सदस्यीय आयोग नेमला होता. आयोगाने परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करूनही, ते आतापर्यंत हजर झालेले नाही. आयोगाने परमबीर सिंह यांना तीनदा दंड ठोठावला होता. जून महिन्यात ५ हजार आणि आणखी दोनदा गैरहजर राहिल्याबद्दल प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला होता.