मुंबई : भाजप शिवसेनेच्या बळावर जिंकते, हा शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ च्या महापालिका निवडणुकीत फुटला, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिका जनतेची कामे व शहराचा विकास करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना मैदानात उतरावेच लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आगामी महापालिका निवडणूक तयारीसाठी मुंबईतील भाजपचे जिल्हाध्यक्ष, बूथ प्रमुख व अन्य नेत्यांची बैठक फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, मिहीर कोटेचा, पराग अळवणी व अन्य पदाधिकारी नेते उपस्थित होते.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करून फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकार करोना काळात कसे अपयशी ठरले, हे जनतेने पाहिले आहे. या संकटकाळात महापालिकेतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. भाजपला शिवसेनेच्या बळावर विजय मिळतो, हा शिवसेनेचा भ्रम महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दूर झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.