अनिल देशमुखांच्या वकीलाला अटक करुन दिल्लीला नेलं; अजित पवार म्हणाले, “आम्ही…”

बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते

Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh lawyer  arrested Deputy CM Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार (संग्रहीत छायाचित्र)
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील अंतर्गत चौकशीची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी स्वतःच्याच अधिकाऱ्याला अटक केली होती. त्यानंतर आता सीबीआयने अनिल देशमुख यांच्या वकिलांना बुधवारी ताब्यात घेतल्यानंतर आता अटक केली आहे. बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर चतुर्वेदी यांची सुटका करण्यात आली होती. मात्र सीबीआयने वकिल आनंद डागा यांना अटक केली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलाला अटक करण्यात आली आहे. त्यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआय उपनिरीक्षकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांनाही सक्षम न्यायालयात हजर केले जाईल,” असे  सीबीआयने म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्या वकिलाला अटक करण्यात आल्यानंतर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. “आम्ही याबाबत पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागितला आहे,” असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

याआधी सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्यानंतर अटक करण्यात आली. इंडिया टुडेच्या सूत्रांनुसार ते कथितपणे अनिल देशमुखांच्या वकिलाच्या संपर्कात होते. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.

“सीबीआयने आपले उपनिरीक्षक, नागपूरस्थित वकील आणि अज्ञात इतरांच्या विरोधात लाचप्रकरणी काही आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सीबीआयने बुधवारी उपनिरीक्षकाला अटक केली आहे. तसेच वकिलाची चौकशी केली जात आहे, ”असे सीबीआयचे प्रवक्ते आर सी जोशी यांनी इंडिया टुडेला सांगितले. प्रयागराज आणि दिल्ली येथील अभिषेक तिवारी यांच्याशी संबधित असलेल्या ठिकाणीही सीबीआयद्वारे शोध घेण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former maharashtra home minister anil deshmukh lawyer arrested deputy cm ajit pawar abn