मुंबई : दहिहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याबरोबरच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यासाठी आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असली तरी एका पथकात सत्तर-ऐंशी गोविंदा असतात त्यातील कोणाला नोकरी देणार ? सर्वात वर चढतो तो वयाने लहान असतो. मग नोकरी देण्याचे आधी निकष ठरवा, अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

दहिहंडी खेळाडूंना नोकरीत आरक्षण देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरून समाज माध्यमांवरही उलटसुटल चर्चा सुरू आहेत. त्याच मुद्द्यावरून माजी महापौरांनी या निर्णयावर टीका केली. गोविंदांना नोकरीत आरक्षण दिले तर त्याचे आम्ही स्वागतच करू पण कसे देणार ते आधी स्पष्ट करा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याकडे आधीच राष्ट्रीय पातळीवरील पदके मिळवलेले खेळाडू नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना आधी नोकरी द्या, असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले. हिंदुत्वाचा आणि मराठीचा पुळका आलेल्यांनी आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असाही टोला त्यांनी हाणला. नुसत्या आश्वासनांच्या वल्गना करायच्या आणि लोकांनी संमोहित करायचे हे फार वाईट आहे, असेही त्या म्हणाल्या.