मुंबई : मुंबईतील खार परिसरात सोमवारी दुपारी भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारगाडीने दोन दुचाकींना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी इयाप्पन सेल्वराज हरीजन (४१) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर त्यांच्या पाठीमागे बसलेल्या पत्नी नॅन्सी हरीजन (३७) आणि अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात निवृत्त ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत (७१) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस व तक्रारदार नॅन्सी हरीजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास इयाप्पन हरीजन पत्नीसह सांताक्रूझ येथील निवासस्थानातून वांद्रे येथे खरेदीसाठी दुचाकीवरून निघाले होते. खार (पश्चिम) येथील सी. डी. रोड आणि १६ व्या रस्त्याच्या जंक्शनवर आले असताना, पाठीमागून भरधार वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोटारगाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे नॅन्सी रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर इयाप्पन मोटारगाडीखाली अडकले. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि इयाप्पन यांना बाहेर काढले. या अपघातात अन्य दुचाकीस्वार राहुल घाणेकर याच्या हाताला फ्रॅक्चर झाले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने इयाप्पन व नॅन्सी यांना रिक्षाने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अतिरक्तस्राव आणि गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान इयाप्पन यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर कायदेशीर कारवाई

या संपूर्ण अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. घटनेनंतर खार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मोटारगाडी चालक सुधीर सावंत हे निवृत्त लष्करी ब्रिगेडियर असून १९९१ ते १९९६ दरम्यान लोकसभेचे खासदार होते. दादरहून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. अपघातानंतर रक्तदाब वाढल्याने सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.