मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ‘जय गुजरात’ घोषणेमुळे शिवसेनेला (ठाकरे) आयताच मुद्दा सापडला आहे. शिंदे यांची ही घोषणा म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांना खूष करण्यासाठी घातलेले लोटांगण आहे, अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. एकनाथ शिंदे स्वत:ला खरी शिवसेना मानतात आणि लोकांना तसे भासवतात. मात्र आज देशाच्या गृहमंत्र्यांसमोर ते लाचार झाले. ‘जय महाराष्ट्र’बरोबरच ‘जय गुजरात’ म्हणणे म्हणजे हिंदीबरोबर आता गुजराती शिकणे बंधनकारक होईल याचीच ही सुरुवात आहे, असाही टोला त्यांनी हाणला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर ‘जय महाराष्ट्र’च्या जोडीने ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यामुळे राजकीय वातावरणात त्यांचे पडसाद उमटले. किशोरी पेडणेकर यांनी समाजमाध्यमांवरून शिंदे यांच्यावर टीका केली.
पेडणेकर म्हण्याल्या की, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो असे एकनाथ शिंदे कायम भासवत आहेत, पण बाळासाहेबांनी कधीही ‘जय गुजरात’ म्हटले नाही. बाळासाहेबच काय पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ‘जय गुजरात’ ही घोषणा मान्य करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, कारकीर्द महाराष्ट्रात झाली ते ‘जय गुजरात’ कधीच म्हणणार नाही. मात्र शहांना खूश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सपशेल लोटांगण घातले आहे. मी तुमचा पाईक आहे हे त्यांना दाखवण्यासाठी आणि अडीच वर्षांनी मला मुख्यमंत्री पद द्या याची आठवण करून देण्यासाठी शिंदे असे करीत आहेत, अशीही टीका पेडणेकर यांनी केली.
भाजप महाराष्ट्रात आग लावण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करीत आहे. आधी हिंदू मुस्लीम वाद निर्माण करून झाला, जातीयवाद झाला, आता भाषेच्या मुद्यावरून भांडणे सुरू झाली, त्यापाठोपाठ प्रांतवादही सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.
शेवटी मावशीला आई मानलंच….
एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दखल घेतली आहे. गुजरातच्या तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलेच, असा मजकूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार यांनी समाजमाध्यमांवर टाकला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या याच घोषणेचा वापर करीत मनसैनिकांनी शनिवारी होणाऱ्या मेळाव्याचीही जाहिरात केली आहे. कळलं?…उद्या मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज का आहे ? असा सवाल करीत मनसैनिकांनी मराठी माणसांना यानिमित्ताने साद घातली आहे.