माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल झाल्यानंतर घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. होमगार्डचे संचालक असणारे परमबीर सिंग सोमवारी सकाळी आपल्या कार्यालयात दाखल झाल्याने पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याची चर्चा आहे. दरम्यान परमबीर सिंग चौकशीसाठी चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. मात्र यावेळी निलंबित असलेले आणि अटकेत असणारे सचिन वाझे त्यांच्यासमोर आले. मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी सचिन वाझे अटकेत असून परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना सचिन वाझेंचा उल्लेख केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल देशमुख प्रकरणी परमबीर सिंह यांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले “माझ्याकडे फक्त ऐकीव….”

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत महाराष्ट्र सरकराने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत केली होती. निवृत्ती न्यायाधीश के यू चांदीवाल या समितीत आहेत. परमबीर सिंग याआधी दोन वेळा चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्याने जामीनपात्र वॉरंट बजावलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर यांना अटकेपासून संरक्षण

परमबीर सिंग आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी सचिन वाझे आणि त्यांचा आमना सामना झाला. दोघांमध्ये काही वेळासाठी चर्चादेखील झाली. मात्र ही चर्चा काय होती हे मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांना एका आठवड्यात मुख्यमंत्री करोना सहाय्यता निधीत १५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस; ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश

मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर यांना अटकेपासून संरक्षण

न्या. एस. के. कौल आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने परमबीर यांच्या याचिकेवर राज्य सरकार, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि सीबीआय यांना नोटीस जारी करून ६ डिसेंबपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे. दरम्यानच्या काळात परमबीर यांनी तपासात सहभागी व्हावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

परमबीर सिंह देशातच आहेत, ते फरारी होऊ इच्छित नाहीत आणि कुठे पळूनही जाऊ इच्छित नाहीत. परंतु त्यांच्या जिवाला सध्या धोका आहे, असे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mumbai police commissioner parambir singh encounter specialist sachin waze chandiwal committee sgy
First published on: 29-11-2021 at 12:00 IST