मुंबई: पाणी न साचण्याचे, नालेसफाईचे मुंबई महापालिकेचे सर्वच दावे फोल ठरल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबईची तुंबई झाली असून नालेसफाईचे कोट्यवधी रुपये वाया गेल्याचा दावा राजा यांनी केला आहे.रविवारी रात्रभर पडलेल्या पावसाने मुंबईतील सर्वच भागात पाणी साचले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबत पुन्हा एकदा यावर्षी देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिकेचे सर्वच दावे खोटे ठरल्याचा आरोप केला आहे. रवी राजा प्रतिनिधित्व करीत असलेल्या शीव परिसरात दरवर्षी पाणी साचते. रविवारी देखील या परिसरात पाणी साचले. किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, शीव या परिसरात पाणी साचले. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत गांधी मार्केट परिसरात वाहतूक वळवावी लागली होती. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून नक्की नालेसफाई केली की तिजोरीची सफाई केली असा सवाल राजा यांनी केला आहे. तर कुर्ला, साकीनाका आणि सगळ्या मुंबईतच पाणी साचले. त्यामुळे नालेसफाईच्या नावाखाली करदात्यांची लूट ही महानगर पालिकेत सुरू आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.राज्य सरकारने सुद्धा दावे केले होते की यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही, पण बघा संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे, असाही टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.