मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम काते यांनी त्यांच्या शाळेतील एका शिक्षकाला शिवीगाळ केल्याची ध्वनीफित गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. काते यांनी शिक्षकाला धमकी दिल्याचे ध्वनीफितीवरून उघड झाले आहे.
काते यांची गोवंडी परिसरात शिक्षण संस्था असून सदर शिक्षक या शाळेत कार्यरत होते. २३ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने शिक्षकाने काते यांच्याशी फोन करून संपर्क साधला आणि वेतन देण्याची विनंती केली. यावेळी काते यांनी शिक्षकाला शिवीगाळ करीत धमकावले. शिक्षक आणि काते यांच्यामधील संभाषणाची ध्वनीफित गुरुवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.
सदर शिक्षकाने पूर्वकल्पना न देता नोकरी सोडली असून टाळेबंदीदरम्यानच्या काळातील वेतनासाठी या शिक्षकाने तगादा लावला होता. यासंदर्भात मुख्यध्यापकांशी चर्चा करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. मात्र माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमावर ध्वनीफित प्रसारित केली, असे तुकाराम काते यांनी सांगितले.