कुणाल कामरावर चार विमान कंपन्यांकडून प्रवासबंदी

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका; समाजमाध्यमांत पडसाद

मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी विमान प्रवासात आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’ कुणाल कामरा याच्यावर चार विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली आहे. या प्रकारावरून समाजमाध्यमांत समर्थनार्थ आणि विरोधात सूर उमटले आहेत.

अर्णब गोस्वामी मंगळवारी ‘इंडिगो’ विमानाने मुंबई-लखनौ असा प्रवास करत होते. त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या कुणाल कामरा याने गोस्वामी यांच्या आसनाजवळ जात आपल्या शैलीत विविध प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. याबाबतची चित्रफीत कामरा याने ट्विटरवर टाकल्यानंतर समाजमाध्यमांत त्याचे पडसाद उमटले.

या घटनेनंतर ‘इंडिगो’ने कामरा याच्यावर प्रवासबंदी घालण्याचा निर्णय घेतला. सहप्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत ‘इंडिगो’ने ही कारवाई केली. ‘इंडिगो’पाठोपाठ ‘स्पाईसजेट’, ‘एअर इंडिया’ आणि ‘गोएअर’ या विमान कंपन्यांनीही कामरावर प्रवासबंदीचा निर्णय घेतला. ‘एअर एशिया’ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सूचना मिळाल्यानंतर कुणाल कामरा याच्याबाबत योग्य ती कारवाई करू, असे स्पष्ट केले तर ‘विस्तारा’ने या घटनेचे पूर्णपणे परीक्षण करून पुढील पावले उचलली जातील, असे सांगितले.

हा प्रकार चुकीचा असून, अशा घटनांमुळे सहप्रवाशांना त्रास होतो, असे सांगत केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इतर विमान कंपन्यांनीही कामरा याच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रकाराचे समाजमाध्यमावर पडसाद उमटले. एकीकडे कामरा याच्या वर्तनावर नाराजी तर दुसरीकडे त्याच्यावर थेट प्रवासबंदीची कारवाई का करण्यात आली, असा सवाल करण्यात येत आहे. #बॉयकॉटइंडिगो हा हॅशटॅगही चर्चेत आला होता.

अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीने रोहीत वेमुलाच्या मृत्यूनंतर केलेल्या वार्ताकनाची ही प्रतिक्रिया होती. मी कोणतीही विध्वंसक कृती केलेली नाही. मात्र, हवाई कंपन्यांनी केलेल्या प्रवासबंदीच्या कारवाईबद्दल आश्चर्य वाटत नाही.-कुणाल कामरा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four airlines ban kunal kamra from travelling zws

ताज्या बातम्या