कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ हॉटेलच्या दुर्घटनाप्रकरणी मुंबई महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांना मंगळवारी पलिका आयुक्त अजय मेहता यांनी निलंबित केले. कर्तव्य बजावताना बेजबाबदारपणा आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. यात कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, स्वच्छता निरीक्षक दीपक भुरळे व विनोद चव्हाण आणि मुकादम तुळसीराम वाघवळे आदी चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ऑक्टोबरमध्ये कुर्ला परिसरातील सिटी कोहिनूर मॉलसमोरील ‘सिटी किनारा’ हॉटेलमध्ये स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे स्फोट होऊन सात विद्यार्थासह एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर पालिका आयुक्तांनी परिमंडळाचे उपायुक्त भरत मराठे यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार या समितीने मंगळवारी याबाबतचा अहवाल सादर केला. गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीद्वारे संबंधित वितरक व संनियंत्रक करणारे संबंधित कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले. मंगळवारी परिमंडळाचे उपायुक्तांनी सादर केलेल्या चौकशी अहवालानंतर ‘सिटी किनारा’ हॉटेलचे मालक सुदीश हेगडे याला पोलिसांनी अटक केली. बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून स्थानिक न्यायालयात हजर केले.