विक्रोळी येथे विहिरीत १८ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या चार मित्रांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक केली. आपल्या मित्राला पोहता येत नसतानाही आरोपी मुले त्याला पोहोयला घेऊन गेले व तो बुडाला असतानाही कोणताही माहिती न देता घरी परतले. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर शोध घेतला असता विहिरीत त्याचा मृतदेह सापडला होता. ही घटना १२ जुलै रोजी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत मुलाच्या चार मित्रांना अटक केली.

हेही वाचा- मुंबई पालिकेच्या कारभाराची चौकशी?; शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

अंतरिश जाधव असे मृत मुलाचे नाव असून तो विक्रोळी पूर्व येथील मुकुंदराव आंबेडकर नगर येथील रहिवासी होता. १२ जुलैला अंतरिशचे चार मित्र घरी आले होते. त्यांनी त्याला सोबत येण्यासाठी विचारले. अंतरीशने दोनवेळा नकार दिल्यानंतर तो त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाला. दुपारी साडेबारा वाजता अंतरिश निघून गेल्यानंतर तो परत आलाच नाही. त्यानंतर अंतरिशच्याबरोबर गेलेला एक मित्र सायंकाळी चारच्या सुमारास अंतरिशच्या घरी आला व तो घरी आला का, असे विचारू लागला. त्यावर अंतरीशच्या वडिलांनी तो तुमच्यासोबतच गेला होता आणि आता तुम्हीच तो कुठे आहे, असे विचारला, अशा प्रश्न त्या मित्राला विचारला. त्यानंतर कुटुंबियांनी अंतरिशचा शोध घेतला असता तेथील विहिरी शेजारी त्याचे कपडे सापडले. तसेच त्याची चप्पल पाण्यात तरंगत होती. अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा- आरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी

अंतरिश बेपत्ता झाला, त्यावेळीही कुटुंबियांनी मित्रांना दूरध्वनी केला होता. पण त्यांनी अंतरिश बद्दल माहिती दिली नाही. अखेर या घटनेनंतर आता विक्रोळी पोलिसांनी चार मित्रांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.