मुंबईः गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाकडील ५ लाख रुपये घेऊन पलायन केलेल्या दोघांविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.

वांद्रे परिसरात राहणारे तौसिफ शेख (३७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, शेख हे वकील असून त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीची पर्यटन व्यवसाय संस्था आहे. तेथेविमान तिकीटे, रेल्वे तिकीटे, पैसे हस्तांतरीत करण्याचे कामकाज चालते. हस्तांतरीत करायची रक्कम एकत्र करून कंपनीच्या खात्यात जमा केली जाते. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या भावाने पायधुनी येथील दोन खात्यात ५ लाख ७० हजार रुपये भरण्यासाठी दिले. शेखने सकाळी पैसे भरण्याचे ठरवले.

हेही वाचा >>>मेहुणीच्या खुनाचा आरोप; खटल्याविना आठ वर्षे कारागृहात असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका

राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम यंत्राच्या माध्यमातून त्यातील ७० हजार रुपये रविवारी सकाळी एका ग्राहकाच्या खात्यात जमा केले. त्यानंतर, दुसऱ्या बँकेत रक्कम जमा करण्यासाठी बाहेर येताच एटीएमच्या प्रवेशद्वारावर त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी थांबवले. गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून चौकशीसाठी सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना एका मोटरगाडीत बसवून त्यांच्याकडील पैशांची बॅग तपासत पैशांबाबत चौकशी सुरू केली. गुन्हा दाखल करण्याची भीती घालून त्यांच्याकडील रोकड काढून घेतली आणि त्यांना सांताक्रूझ परिसरात उतरवले. त्यांनी घडलेला प्रकार भावाला सांगून पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.