मुंबई: दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची(डीएचएफएल) एक हजार ५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चार कंपन्या व त्याच्या संचालकांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  आरोपी संचालकांनी त्यांची मालमत्ता गहाण ठेवून २०११ ते २०१८ दरम्यान डीएचएफएलकडून कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची रक्कम इतर कारणांसाठी वापरली गेली. तसेच कर्जाची रक्कम इतर बँकांची कर्जे फेडण्यासाठी वापरली गेली.  आरोपींनी डीएचएफएलकडून परवानगी न घेता गहाण ठेवलेली मालमत्ता विकली, अशा प्रकारे कर्ज कराराच्या अटींचा भंग केला, असे पोलीस सूत्रांचे  सांगितले.

बांधकाम व्यावयासिक चार कंपन्यांचा नऊ संचालकांविरोधात याप्रकरणी भादंवि कलम ४०६ (विश्वासघात करणे), ४२० (फसवणूक), ४६७ (मौल्यवान सुरक्षिततेची बनावट कागदपत्रे), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे) ४७१ (खोटी कागदपत्रे खरा म्हणून वापरणे) आणि ३४ (खोटी कागदपत्रे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आरोपींनी २०११ ते २०१८ दरम्यान त्यांच्या काही मालमत्ता गहाण ठेवून डीएचएफएल कडून कर्ज मिळवले. कर्जाची रक्कम इतर बँकांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात आली होती त्याशिवाय इतर कारणांसाठी वापरली गेली होती. आरोपींनी नाना चौकातील एका निवासी प्रकल्पाचे नऊ सदनिका डीएचएफएलची पूर्व परवानगी किंवा एनओसी न घेता पाच जणांना विकल्या. एकूण ७९३ कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेपैकी ४६२ कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. व्याज जोडून एकूण एक हजार ५७ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अमोल वालावलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएचएफएल कंपनीचा कार्यभार सध्या पिरॅमल कॅपिटल अ‍ॅण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने हाती घेतला आहे.