मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध एसटीतील कर्मचारी संघटनांनी नोंदविला असून संपकरी कर्मचाऱ्यांची नेतृत्वाकडूनच फसवणूक झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. विलीनीकरण, सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी संपाचे नेतृत्व करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचा प्रकार असल्याचे मत संघटनांनी नोंदविले आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी विलीनीकरण होणार असे सांगून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. मनमानी पद्धतीने व इतरांचा द्वेश करून संपकरी कामगारांना त्यांच्या नेत्यांनी फसवले, असा आरोप मान्यताप्राप्त स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी केला आहे. काल न्यायालयाचा निकाल आला त्याचे स्वागत करून गुलाल उधळला गेला, पण प्रत्यक्ष निकाल हातात आल्यावर कामगारांना नेतृत्वाकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. विलीनीकरण, सातव्या वेतन आयोगाचे लाभ या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, पाच महिन्यांचा पगारही नाही हे अपयश लपवण्यासाठी कामगारांना भडकवण्यावत आल्याचेही शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याच्या घटनेचाही आम्ही निषेध करत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणी श्रीरंग बरगे यांनीही हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख व ९१ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत. काही प्रमाणात वेतनात वाढही झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयात याच सर्व बाबी आल्या आहेत. या सर्व बाबी न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मान्य करण्यात आल्या आहेत असे सांगून अपयश लपविण्यासाठी नियमबाह्य कृती सुरू असल्याची टीका त्यांनी केली.